Monday, February 14, 2011

"शब्द"

कधी केव्हा कसे कुठुन,
शब्द घरंगळत आले,
अन माझ्याही नकळत,
कागदावर विराजमान झाले...

शब्दांनीच ओवी सजली,
शब्दांनीच सजले गाणे,
शब्दच नसतील ओठी,
मग कसले धूंद तराणे....

कबीराचे रचले दोहे,
तुकयाचे अभंग रचले,
ज्ञानेश्वरीचे एकेक पान,
रसाळ शब्दांनीच सजले....

डोंगर माथ्याने घोंगावत,
एक एक शब्द येतो,
धनगरी गीताचा जसा,
ढोल कडाडुन वाजतो....

लाटांच्या गाजेत,सागराच्या कुशीत,
शब्द शब्द हिंदकळतो,
जसा कोळीयाचा राजा,
कोळीगीतावर डोलतो......

शब्द म्हणजे लावणीतला श्रृंगार,
शब्द म्हणजे पोवाड्यातला अंगार,
शब्दच नसेल दिमतीला,
फुकाचा तो श्रृंगार अन,
विझलेला तो अंगार......

शब्दांनीच साजरी होळी,
शब्दांनीच रंगते रांगोळी,
शब्दांचाच लावुन फुलबाजा,
साजरी होते दिवाळी......

शब्दांचा नसतो नेम,
शब्दांनीच फुलते प्रेम,
शब्दांचेच करुनी खेळ,
तरुणाईचा बहरतो "लव्ह गेम"...

शब्द ह्रदयाचा ध्यास,
शब्द मोगर्‍याचा सुवास,
शब्दावाचुन व्यर्थ सारे,
शब्द माझ्या काव्याचा "श्वास".....

या शब्दांचीच केली पंचारती,
शब्दांचीच केली तोरण काठी,
शब्दांचेच करतो हे काव्य बहाल,
रसिका, फक्त तुझ्याच साठी..........

         
नंदू

No comments:

Post a Comment