Monday, February 14, 2011

रहदारी

मुंबई नगरी हाय बडी बांका,
तिचा सार्‍या जगती लई डंका,
धुरळा उडतोया नाका डोळ्यांतुन,
पर,गाड्या जरा सावकाशीनं हांका.....
गड्या हो.......
गाड्या जरा सावकाशीनं हांका.......

मुंबई नगरीची शान लई न्यारी,
हितं गाड्या असती श्रीमंता घरी,
त्या फिरविती पोरं आन पोरी,
ह्या मुंबईच्या मोठाल्या रस्त्या वरी,
धुळ गेली नाकी तोंडी मंग येतील,
भराभर शिंका......
गड्या हो......
गाड्या जरा सावकाशीनं हांका.......

मुंबईची ही अनोखी रहदारी,
सकाळला निगाली हापिसला,
तर दुपारी पोचतिया स्वारी,
वाटेतला ट्राफिक पार करता करता,
जीवाची घालमेल होतिया भारी,
रस्ता ओलांडताना आपला श्वास वाईच रोखा,
गड्या हो.....
गाड्या जरा सावकाशीनं हांका........

जंक्शनला सिग्नलचं लई मोठं जाळं,
ट्राफिक पोलीसाची उडतीया तारांबळ,
शिट्या फुंकुनी घशाची होतीया भेळं,
रहदारीतुन वाट काढताना होतीया,
लहाना मोठ्याची धावपळ.......
धावणार्‍या गाड्यांतुनी ओलांडताना,
जीव धोक्यात घालु नका.....
गड्या हो....
गाड्या जरा सावकाशीनं हांका.......

अशी ही मुंबापुरीची जीवघेणी रहदारी,
हिथं गाड्या धावती खाजगी अन सरकारी,
कित्येकांना हिथं मिळती रोजंदारी,
ड्रायव्हरची मिळं नोकरी श्रीमंता घरी,
पोटा पाण्याला लावी मुंबई नगरीची रहदारी,
पगार पाण्याचं काय बी ईचारु नका.....
गड्या हो......
गाड्या जरा सावकशीनं हांका.......

हे असं जीवन मुंबईचं,
लई बघा धका धकीचं,
चाकरमान्याच्या पराकष्टाचं,
प्राण हाती घेउन धावणार्‍यांचं,
मुंबईच्या रहदारीचं वेसण हाती,
ठेवणार्‍या ट्राफिक पोलीसांचं,
म्हणुनच म्हणतो लोक हो,
मुंबापुरीच्या पायी नतमस्तक होऊन झुका...
गड्या हो.....
गाड्या जरा दमानंच हांका.........

      








नंदू

No comments:

Post a Comment