Monday, February 14, 2011

का...?

का विसरावंस तु मला,
अन का विसरावं मीही,
स्नेह बंधाचं प्रतिबिंब पडलंय,
बघ त्या गहिर्‍या पाण्यातही...(१)

का तोडावंस तु मला,
अन का तोडावं मीही,
जोडणारा रेशिमधागा बघ,
त्या फुलाच्या पराग कणांतही...(२)

का विस्कटावंस तु मला,
अन का विस्कटावं मीही,
नीट घातलेली घडी बघ,
त्या न विस्कटलेल्या शालीतही...(३)

का कुस्करावंस तु मला,
अन का कुस्करावं मीही,
हसणार्‍या पाकळ्या बघ,
त्या डोलणार्‍या फुलातही.....(४)

का रुसावंस तु माझ्यावर,
अन का रुसावं मीही,
ते निरागस हास्य बघ,
बागडणार्‍या ईवल्याश्या बाळातही...(५)

का अबोल व्हावंस तु,
अन का अबोल होऊ मीही,
तो गुंजणारा आवाज ऐक,
त्या स्पंदणार्‍या श्वासातही....(६)

कसं निरसावं हे सर्व,
कसं रुचेल मनासही,
जीवनाचा अर्थ कळतो,
त्या एकांतातल्या तृणासही...(७)

            
  नंदू

No comments:

Post a Comment