Sunday, July 31, 2011

हद्द झाली....

वाट पहाण्याची हद्द झाली,
डोळे ही कसे पेंगु लागले,
रात्र ही आता हद्दपार झाली,
अंगणी सुर्यकिरण रांगु लागले....

गजर्‍याच्या सुवासाने,
खोली गंधीत झाली,
खिडकीत उन पावसाचे,
खेळ रंगु लागले,
तुझ्या पैंजणांच्या चाहुलीने,
पावसाचे थेंब ही झिंगु लागले....

चिंब भिजलेल्या आठवणी,
घरभर धावु लागल्या,
आता ती नक्की येणार,
पावसात चिंब न्हाऊन निघणार,
असं पावसाचे तुषार,
माझ्या कानी सांगु लागले....

पण ती आलीच नाही तर..?
पावसात चिंब न्हालीच नाही तर..?
ह्या विचारानींच विस्कटलेले,
माझे ह्रदय पंगु होऊ लागले....
नंदू

असेन मी....

आठवणींत वावरत,
असेन मी....
श्वासांना सावरत,
असेन मी....
डोळे घट्ट मिटुन घे,
अन बघ....
स्वप्नामध्ये बावरत,
असेन मी....

ह्रदयीच्या स्पंदनांत,
असेन मी....
अंगठीच्या कोंदनात,
असेन मी....
जरा बाहेर ये,
अन बघ....
प्राजक्ताच्या प्रांगणात,
असेन मी....

केसातल्या गजर्‍यात,
असेन मी....
डोळ्यांतल्या काजळात,
असेन मी....
आत डोकाव जरा,
अन बघ....
ह्रदयी दाटुन,
आलेल्या वादळात,
असेन मी....

चांदणीच्या शीतल छायेत,
असेन मी....
गर्द हिरव्या वनराईत,
असेन मी....
नदीच्या पात्रात,
पाय सोड,
अन बघ....
पाण्यात पडलेल्या,
चंद्राच्या प्रतिबिंबात,
असेन मी....

बहरलेल्या शिशिरात,
असेन मी....
हरवलेल्या तिमिरात,
असेन मी....
वसंतात घेतलेल्या झोक्यात,
असेन मी....
ह्रदयावर हात ठेव,
अन बघ....
धडधडत्या प्रत्येक ठोक्यात,
असेन मी....

तुझ्या नजरेने पहाशील,
तर जळी,स्थळी,पाषाणी,
दिसेन मी....
अन माझ्या नजरेने पहाशील,
तर फक्त तुझ्याच ह्रदयात,
दिसेन मी.......
नंदू

ओली बट...

ओली बट तुझ्या डोळ्यावर,
रुळु पहात होती,
ओली बट तुझ्या नजरेशी,
खेळु पहात होती,
तुझ्या नजरेची नशा,
काही औरच आहे बाई,
ओल्या बटेतील थेंबांची रांग,
तुझ्या मादक नजरेत,
विरघळु पहात होती....

ओली बट तुझ्यासाठी,
झुरु पहात होती,
ओली बट तुझ्या ह्रदयी,
अलगद शिरु पहात होती,
तुझ्या ह्रदयाची बात,
काही खासच असते बाई,
ओली बट तुला आपलं,
ह्रदय हरु पहात होती....

ओली बट तुला कवेत,
कवटाळु पहात होती,
ओली बट तुझ्यावर,
जीव ओवाळु पहात होती,
तुझ्या अदांची जादु,
काही न्यारीच असते बाई,
ओली बट तुझ्या ह्रदयापाशी,
रेंगाळु पहात होती....

ओली बट आताशा तुझ्या,
गालाशी लगट करु पहातेय,
का असं करुन ती आपल्या,
भावना प्रगट करु पहातेय,
काही कळेना झालंय तिला,
पण ह्रदया पर्यंतची ओली वाट,
मात्र बिकट करुन जातेय....
नंदू

पिछेहाट...

महाराष्ट्र देशी मराठीची,
होत चाललीय पिछेहाट,
घसरतोय टक्का मराठी मनाचा,
येथे उपर्‍यांची मात्र कॉलर ताठ....

विझलेल्या मनांमध्ये,
ठिणगी काही पडत नाही,
मराठीच्या जयघोषाची,
राळ नुसतीच उडत राही,
मराठीच्या अस्मितेची,
पोळी भाजणार्‍यांनी मात्र,
थोपटुन घेतलीय आपलीच पाठ....

कुणाचा पायपोस,
कुणास नाही,
मागचा पुढच्याची,
टांग खेचत राही,
परक्यांच्या नावे,
ठणाणा करणार्‍यांनी,
भरुन घेतलेत,
आपलेच माठ....

खुशाल बंद करुन घ्या,
तुमच्या मनाची कवाडे,
पडणार नाही थाप,
आता डफावर,
मिळणार नाहीत आता,
ऐकण्या क्रांतीचे पोवाडे,
विझलेल्या निखार्‍यांत,
नुसताच धुर दिसतोय,
मोडलेल्या कण्यांनी,
कशी करावी मान ताठ....

मराठीची होत चाललीय पिछेहाट.....
मराठीची होत चाललीय पिछेहाट.....

नंदू

फक्त तुझ्याचसाठी...

सोनचाफ्याचा गंध दरवळला,
तुझ्याचसाठी....
गुलमोहर ही बघ बहरला,
तुझ्याचसाठी....
नदिचं खळाळणं हे ही,
तुझ्याचसाठी....
तृणपातीचं तरारणं ते ही,
तुझ्याचसाठी....
जलधारांचं उन्मुक्त बरसणं,
तुझ्याचसाठी....
वेड्या मनाचं उदासीन तरसणं,
तुझ्याचसाठी....
मनमोराची केकावली ही,
तुझ्याचसाठी....
कोकिळेची स्वरावली ही,
तुझ्याचसाठी....
शांत सागराची सुरेल गाज ही,
तुझ्याचसाठी....
हिरवाईचा हिरवा साज ही,
तुझ्याचसाठी....
चंद्र ही बघ भारावलेला,
तुझ्याचसाठी....
एकच क्षण पण हरवलेला,
तुझ्याचसाठी....
क्षणभरच दिसलेली ती,
ओझरती अंगकाठी....
घट्ट झाल्या आपसुकच,
भावनांच्या रेशीमगाठी....
आता जरी नसलीस तु,
माझ्या ह्रदया पाशी....
जन्मभरीची वाट पहाणं आलं,
फक्त तुझ्याचसाठी....
फक्त तुझ्याचसाठी....


नंदू

आक्रोश...

तो खिन्न मनाने,
एकटाच चालत होता,
पायाखालची जमीन,
सरता सरत नव्हती,
चिंधड्या झाल्या होत्या,
डोक्यातल्या मेंदुच्या,
ह्रदयीची खोल जखम,
मात्र भरता भरत नव्हती....

कुठवर हे भोग सहन,
करायला लागणार,
डोक्यातली मुंगी,
विचारांचं वारुळ करत होती,
मेलेल्या मढ्यांची भग्न,
ह्रदये इतस्ततः पसरलेली,
जिवंत मनांची स्पंदने,
मात्र तीळ तीळ मरत होती....

खचलेले मन त्याचे,
आक्रंदन करत होते,
शुष्क झालेल्या वाटेवर,
एकटेच रुदन करत होते,
दुर्गंधी सुटलीय सार्‍या,
सडलेल्या "सिस्टीमला"
दिवाना आक्रोश,
विझलेल्या श्वासांचा,
रक्ताळलेले चंदन मात्र,
चुपचाप जळत होते....

नंदू

क्षण भंगुर जीवन....

क्षण भंगुर हे जीवन झाले,
किंमत त्याची कवडी मोलाचीच,
आश्वासनांची खैरात जाहली,
पण प्रत्यक्षात मात्र....
भात बोलाचा अन कढी ही बोलाचीच....

दहशत वादाला नसतो चेहरा,
नसते जात अन धर्म,
असते भाषा फक्त बॉम्ब,गोळ्यांची,
निरपराधांचा जात असे बळी,
अन राख होते जीवन मुल्यांची....

सत्तेच्या बाजारात माणुसकीला,
आली किंमत पहा शुन्याची,
पैशाची चढलीय धार पापाला,
भिती वाटु लागली पुण्याची....

मेल्या मढ्यावरचे लोणी खाती,
काय पडलीय त्यांना कुणाची,
विकृत विळखा घट्ट होऊ लागला,
घालमेल होतेय सच्च्या मनाची....

राज्य कर्ते उदासिन येथे,
बापुडवाणी स्थिती दीनांची,
वेठीस धरती दीन दुबळे,
सरशी होई येथे गनिमांची....


नंदू

मला आठवतंय.....

मला आठवतंय.....
आईने बोट धरुन,
मला पहिल्यांदा उठवलेलं,
त्या एका बोटात आयुष्य भराचं,
प्रेम साठवलेलं....

मला आठवतंय.....
बाबांचा हात पकडुन टाकलेलं,
ते शाळेतलं पहिलं पाऊल,
तिथेच उत्तम संस्कारांची,
लागलेली अनाहुत चाहुल....

मला आठवतोय.....
शाळेतला तो दिवस पहिला,
अवती भवती मुसमुसणार्‍या,
चेहर्‍यांमुळे चांगलाच लक्षात राहिला....

मला आठवतोय.....
दहावीचा पहिला वहिला निकाल,
धडधडणार्‍या ह्रदयानेच,
उजाडलेली ती सकाळ....

मला आठवतोय.....
तो पहिला दिवस कॉलेजचा,
आजुबाजुला दिसलेल्या,
सुंदर चेहर्‍यांमुळे,
नव्यानेच कळलेल्या नॉलेजचा....

मला आठवतंय....
माझं पहिलं वहिलं,
एकुलतं एक प्रेम,
अगदी तुमच्या सारखंच,
माझं ही होतं डीट्टो सेम....

मला आठवतोय.....
तो पहिलाच दिवस पोलीस ट्रेनिंगचा,
पिटी चुकल्यामुळे शिक्षा म्हणून,
पिटीच्या मास्तरांकडुन मिळालेल्या,
फ्रंटरोल आणि क्राऊलिंगचा....

मला आठवतोय.....
माझा पहिलाच पगार पाहिलेला,
धावत घरी जाऊन,
आईच्या चरणी वाहिलेला....

मला आठवतंय.....
मी फर्स्ट युनिफॉर्म घातलेला,
माझ्याही नकळत बाबांनी,
मला सलाम ठोकलेला....

मला आठवतेय.....
लग्नानंतरची ती पहिली,
वहिली मधुचंद्राची रात्र,
फुलांनी सजवलेला पलंग अन,
केशरी दुधाचा ग्लास नसतानाही
मोहरली होती माझी गात्र न गात्र....

मला आठवतंय.....
माझी पहिली मुलगी जन्मली जेव्हा,
बाबा होण्याची जबाबदारी जाणवली,
होती पहिल्यांदा तेव्हा....

मला आता आठवतंय.....
असंच आपलं बरंच काही बाही,
पण पहिल्या वहिल्याला मात्र,
जगात कुठली तोडच नाही.......

नंदू

आताशा....

आताशा रेशनच्या रांगेत,
रोजच मी दिसत आहे,
गावचं शिवार कसं,
पावसा शिवाय नासत आहे,
हे सगळं आता आठवलं की,
कळकट्ट बाहीने आसवं,
माझी मीच पुसत आहे....

आताशा हातावर पोट ठेऊन,
जगतोय मी कसाबसा,
लहानग्यांचा भुकेने,
व्याकुळ झालाय घसा,
खोलवर झालेली,
जखम माझ्या अंतरीची,
आता मात्र चांगलीच,
ठसठसत आहे....

आताशा रोजगाराची माझी,
रोजचीच पडते भ्रांत आहे,
वरवर दाखवत असलो,
शांत शांत तरी ही,
आतुन मात्र कमालीचा,
अशांत आहे,
वेदनेला बाजुला सारावं,
म्हटलं तरी ही,
वेदनाच आताशा,
माझ्यावर रुसत आहे....

आताशा मायबाप माझ्या वाटेकडं,
डोळे लावुन बसलेत,
डोळ्यासंग आता हातपाय,
बी दोघांचे ही थकलेत,
आता तर रोजच माझ्या,
सपनात ते सगळं येतं,
आताशा ते शिवार बी,
माझ्या ह्या दुर्दशेवर,
म्लान पणे हसत आहे....
नंदू

फक्त आठवणींतुन उरलीस

मी सरळच चालत होतो,
तुच वाकड्यात शिरलीस,
मी तीरपा कटाक्ष काय फेकला,
सरळ सरळ ह्रदयच हरलीस....

मला ही आधी वाटलं,
ही थोडी गंमत असेल,
मी फेकलेल्या कटाक्षाची,
मिळालेली ही किंमत असेल....

पण जेव्हा ओठांच्या,
मोहोळीतुन गुलाबी हसलीस,
त्या जीवघेण्या हास्याने,
थेट माझ्या ह्रदयाला डसलीस....

सरळ माझ्या डोळ्यांतुन,
माझ्या मनात भरलीस,
आयुष्यभर साथ देण्याच्या,
आणाभाका घेऊन,
माझ्याच कुशीत विरघळलीस....

पण अचानक......
अचानक एक दिवस,
मला त्या वाटेवर,
पुढे जाऊ देऊन,
स्वतः मात्र हलकेच,
माझ्या ही नकळत,
मागे सरलीस....

आताशा ती वाट वाकडी,
करुन मी जात नाही,
कारण त्या सरळ वळणावर,
आता तु.....
तु फक्त माझ्या,
आठवणींतुनच  उरलीस....

नंदू

Thursday, July 28, 2011

राधा अन मीरा...

राधेने प्रितीचा ठेवा,
कृष्ण भक्तीने माथी लावला,
अन मीरेने भक्ती रसाचा,
प्याला प्रितीने ओठी लावला....

राधेला बासरीत ही,
कृष्णाची प्रित गवसली,
मीरा ही एकतारी घेऊन,
कृष्णभक्तीत तल्लीन झाली....

एकीला भक्ती,
प्रितीत गवसली,
एकीची विरक्ती,
भक्तीत विलीन झाली....

प्रिती अन भक्ती,
दोन्हींची सांगड,
कृष्णाच्या ठायी,
अलौकीक अन अजोड,

गोपसखा श्री हरी,
राधेचा मैत्र कान्हा,
मीरेच्या भजनांनी,
वेडावला पुन्हा पुन्हा....
नंदू

पाऊस म्हणजे....

पाऊस म्हणजे,
एक गोड आठवण....
पाऊस म्हणजे,
ओली चिंब साठवण.....
पाऊस म्हणजे,
धरीत्रीचा ओला मृदगंध....
पाऊस म्हणजे,
इतरांसोबत,
उपभोगलेला स्वानंद....
पाऊस म्हणजे,
सागराची शांत गाज....
पाऊस म्हणजे,
निसर्गाने ल्यालेला,
हिरव्या पाचुचा साज....
पाऊस म्हणजे,
सागर मिलनासाठी,
निघालेली अवखळ सरीता....
पाऊस म्हणजे,
निर्मळ मनाची आनंदीता....
पाऊस म्हणजे,
बिस्मिल्लांची सुरेल शहनाई....
पाऊस म्हणजे,
वेडावलेली अल्लड तरुणाई....
पाऊस म्हणजे,
रविशंकरजींची सतार,
पाऊस म्हणजे,
ह्रदयीची छेडलेली तार....
पाऊस म्हणजे,
हिरवाईला आलेला बहर....
पाऊस म्हणजे,
उधानलेल्या मनांचा कहर....
पाऊस म्हणजे,
भोळा शंकर,
हिमनगावर उभा....
पाऊस म्हणजे,
अंगावर कोसळणारा,
बेधुंद धबधबा....
पाऊस म्हणजे,
गारठलेली थंड पहाट....
पाऊस म्हणजे,
सागराची सळसळणारी लाट....
पाऊस म्हणजे,
गरम भज्यांचा खमंग स्वाद....
पाऊस म्हणजे,
वाफाळलेल्या चहाचा आस्वाद....
पाऊस म्हणजे,
तुषारलेली तृणपात....
पाऊस म्हणजे,
धरीत्रीने जोडलेली,
निळ्या घनाशी रेशीमगाठ....
पाऊस म्हणजे,
लिहिण्या सारखं,
अजुन बरंच काही....
पाऊस म्हणजे,
तुर्तास एवढंच,
आणिक काही नाही.....


नंदू

बळीराजा

लई दीसांनी आभाळात,
काळे ढग दिसाया लागले,
बळीराजा बी लई आनंदला,
त्याचे हात जीमीन कसाया लागले....

पाऊस बघाया त्याचे,
डोळे आतुर झाले,
पर ते ढग त्याच्या,
नशीबावरच फितुर झाले....

ढग आले तसे निघुन बी गेले,
आभाळ बी वांझोटे दिसाया लागले,
क्षणभरच आनंदलेल्या त्या डोळ्यांतुन,
विझलेले दोन अश्रु बरसाया लागले....

दीसा मागुन दीस काळवंडले,
दुष्काळाने त्याचा हातच छाटला,
त्याची विस्कटलेली अवस्था बघुन,
सुकलेल्या शेताचा बी उर फाटला....

नंदू

ती सहनायिका...

नायकाला जेव्हा,
नायिका मिळाली,
ती मात्र तेव्हा,
सहनायिकाच राहीली,
कथा कादंबर्‍यांत
रमणार्‍यांनी मात्र,
तिची ती विरह कथा,
कधी नाही पाहीली....

देव जेव्हा पारोच्या वियोगात,
त्या मदिरेचा दास झाला,
चंद्रमुखीच्या उत्कट प्रेमाचा,
तेव्हाच बघा र्‍हास झाला......

पारो जेव्हा देवच्या प्रेमाची,
होती दासी बनुन राहीली,
तिकडे चंद्रमुखी मात्र त्या,
प्रेमापासुन सदा वंचितच राहीली....

ललीता जेव्हा शेखरच्या ह्रदयी,
परिनीता होऊन बसली,
तेव्हाच गायत्रीच्या ह्रदयात,
उपेक्षित प्रेमाची कळ घुसली....

शेखर ललीताचे अखेरीस,
जेव्हा मनोमिलन झाले,
गायत्रीच्या भाळी तेव्हा,
प्रितीचे उपेक्षित अश्रु आले....

पुराणात जरी आपण,
थोडं डोकावुन पाहीलं,
तिथेही तिने नायिकेच्या,
ओंजळीत त्यागाचं फुल वाहीलं....

जानकीच्या नशीबी रामासह,
तो शापित वनवास आला,
तिथे मात्र उर्मिलेने चौदा वर्षं,
एकांत वास भोगला.....

लक्ष्मणाची तिला कधी,
आठवण नसेल का आली,
पण रामायणात ही पहा,
ती सहनायिकाच झाली....

राधा श्रीकृष्णाची बनली सखी,
तर सुभद्रेच्या नशीबी,
कृष्णाचा पावा आला,
पण कृष्णाच्या भक्तित रमलेल्या,
मीरेने प्यायला हसत विषाचा प्याला....

चित्रपटांतली नायिका जेव्हा,
नायकाच्या मनी हिंदकळते,
सहनायिकेचं प्राक्तन मात्र,
अंधार्‍या दरीत ठेचकाळते....

हे असंच उपेक्षित जीणं,
ती सहनायिका जगली,
कथा कादंबर्‍यातुन रमणार्‍यांनी,
तिची आंतरीक व्यथा,
कधी नाही जाणली.......

हा असाच विरक्त भोग,
त्या तिसर्‍या पात्राच्या,
नशीबी येतो....
कथेतला तो तिसरा कोन,
नेहमीच उपेक्षिला राहातो....


नंदू

Wednesday, July 27, 2011

अबला की....?

दरवेळी पुरुषानेच का स्त्रीची चाचणी करावी,
दरवेळी तिनेच का त्याच्यासाठी परिक्षा द्यावी,
पातिव्रत्याचा दाखला दाखवण्या करीता,
दरवेळी सितेनेच का अग्नित उडी घ्यावी...?

पुरुषांचे राग लोभ सतत सहन करत,
तिनेच का निमुट आसवं गाळावी,
पुरुषांनी एक पत्निव्रताचा टेंभा मिरवावा,
मग कुंतिनेच का गर्भधारणा लपवावी...??

आजची स्त्री खरंच अबला आहे का हो,
प्रत्येकीने आपल्या आत झाकुन पहावे,
पुरुषांच्या खांद्याला खांदा भिडवणार्‍यांनी,
पन्नास टक्के आरक्षणाची मागणी तरी का करावी...???

नंदू

एक लहानसे तारु

महा सागरातले,
एक लहानसे तारु,
वार्‍यासंगे लागलेय,
इतस्ततः फिरु,
शिडाने ही फिरवलीय,
पाठ त्याच्याकडे,
वादळातली झुंज,
त्याची झालीय सुरु....

पेलवेनासे झालेय,
ओझे सागराचे,
अंगावर झेलत घाव,
मुजोर लाटांचे,
लडखडत,हेलपाटत,
कसेबसे तरी,
स्वतःलाच पाण्यावर,
लागलेय सावरु....

बिचार्‍याचा चेहरा,
कसा रडवेला झालाय,
नांगराचा फाळ देखील,
लटपटु लागलाय,
ओळखीची गलबतं सुद्धा,
अनोळखी भासली,
मदती साठी आता,
कसं कुणाला पुकारु....

आकाशातले तारे,
आता मिनमिनु लागले,
थंडगार वारे आता,
अंगास झोंबु लागले,
आठवण येऊ लागली,
बंदरात पहुडलेल्यांची,
बिचार्‍याच्या डोळ्यांत,
पाणी येऊ लागलं भरु....

रात्रभर त्याच्या,
डोळ्यास नव्हता डोळा,
घरच्यांच्या आठवणीने,
दाटून येई गळा,
अचानक लागला,
दिसु त्यास किनारा,
आनंदानं बेभान झालं,
जसं उधानलेलं वारु....

रात्रभर महाकाय लाटांशी,
झुंजार पणे लढत,
मालवाहू जहाजांतून,
कशीबशी वाट काढत,
गुपचुप बंदरात जाऊन,
शांत उभं राहीलं,
बंदरातुन शिडहोडीची,
हाक ऐकु आली.....
रात्रभर कोठे होतास...?
बर्‍या बोलाने सांगशील,
का पाठीत धपाटा मारु....???

नंदू

विरानी....(हिंदी)

भिनीभिनी सी खुशबु,
आती है मिट्टी की,
जब हौले से पानी,
बरसने लगता है,
दूर कही कोयल की,
कुहुक सुनाई देती है,
और मन सजना के लिये,
तरसने लगता है....

बन में मोर जब,
बेहोश नाचने लगता है,
तब मन मुरत को,
साजन तराशने लगता है,
जब धुंधली सी,
हो जाती है तस्वीर उसकी,
तब ये मन अंजाने में,
किसी को तलाशने लगता है....

अब भी बरसात हो रही है,
बाहर भी और मन में भी,
अब भी तेरी यादे जलाती है,
तन को भी और मनको भी,
जब भी कोई हलकीसी आहट,
सुनाई देती है दरवाजे पर,
पलके ढुंढने लगती है,
दूर से आनेवाले कोई उन को भी....

अब तो बारीश थम गयी है,
मगर यादों का जमघट वैसाही है,
मन की बरसात कौन रोकेगा,
बारीश का संकट वैसाही है,
अब तो मन भी बेचारा बेजान सा,
उन यादों में झुलसने लगता है,
दूर पहाडी के पास कोई पागल,
अपनी ही धुन में विरानी गाने लगता है....
नंदू

पाऊस मनातला

आवरता आवरेना,
नयनांतली बरसात,
आठवांनी जमण्यास,
आता केलीय सुरुवात....

कोसळणार्‍या जलधारा ही,
काही बरसायचे थांबेनात,
भावनांचा ह्रदयी माझ्या,
आदळतोय झंझावात....

तो सागर ही उधानलेला,
कवेत घेण्या आसुसलेला,
सरीता ही बेभान झाली,
शिरण्या सागराच्या ह्रदयात....

पाऊस मनातला माझ्या,
डोळ्यांवाटे पाझरु लागला,
मनीचे गुज तुला सांगण्या,
मन धावले सोडुन रीतभात....

जलधारा अंगावर घेत,
मी मात्र अबोल उभी,
उलगडता ही येईना,
अंतरीचे गुढ गर्भी,
आक्रंदन एका प्रियेचे,
दिसेल का रे भर पावसात....

तो पाऊस ही कठोर कसा,
सुर्यास दिसभर लपविता झाला,
मी मात्र ह्रदयीचा तेवता दिवा,
घेऊन उभी,
वाट पाहातेय दिनरात....
वाट पाहातेय दिनरात....
नंदू

आताशा हे असं का होतं....?

आताशा हे असं का होतंय,
की,माझ्या मनाचा खेळ आहे,
का नियतीने साधलेली,
ही अचुक अवेळ आहे....

आताशा हे असं का होतंय,
की,देवाची अगाध लीला आहे,
का त्याच्या निष्प्राण ह्रदयाला,
तिच्या श्वासाने उजवा कौल दिला आहे....

आताशा हे असं का होतंय,
की,निसर्गाने दिलेली हाक आहे,
का मनाने यौवनाकडे केलेली,
काहीशी डोळेझांक आहे....

आताशा हे असं का होतंय,
की,प्रेमाने दिलेली साद आहे,
का भावनांच्या कल्लोळात,
उमटलेला आंतरीक पडसाद आहे....

आताशा हे असं का होतंय,
की,कोमेजल्या फुलाचे दुखः आहे,
का भ्रमराला लागलेली ही,
त्या फुलाबद्दलची रुखरुख आहे....

आताशा हे असं का होतंय,
की,शांत सागराची व्यथा आहे,
का सागरभेटीला निघालेल्या सरीतेची,
उधानलेली प्रितकथा आहे....

आताशा हे असं रोजच होतं,
स्वप्नांच्या राज्यात मन भरकटतं,
उजाडताना कधीतरी जाग येताच,
विचारांचं गाठोडं आपसुकच विस्कटतं....


नंदू

क्षण एक प्रेमाचा

क्षण एक तो प्रेमाचा,
मला खुप आठवुन गेला,
विसरलेल्या आठवणींत,
मलाच गोठवुन गेला.....

मी ही वेड्या सारखा,
स्तब्ध उभा राहीलो,
विखुरलेल्या आठवांना,
क्षणभरच साठवुन गेला.....

मनातली तुझी आठवण,
क्षणापुरतीच का होईना,
माझ्या रिक्त ओंजळीत,
मुक्तपणे पाठवुन गेला.....

क्षणभराची आठवण आता,
आयुष्यभर सोबतीला आहे,
भिजलेल्या आसवांना माझ्या,
क्षणभरच गारठवुन गेला.....

मुक्त क्षण तो प्रेमाचा,
क्षणोक्षणी अनुभवला होता,
एका विरघळलेल्या क्षणी तो,
अनपेक्षित घरंगळुन गेला.....

क्षण एक तो प्रेमाचा,
मला खुप आठवुन गेला,
आर्त भावना माझ्या,
कायमच्या मिटवुन गेला.....
कायमच्या मिटवुन गेला.....


नंदू

मी हा उभा असा....

रोज फिरुन नवे स्वप्नं,
रोज फिरुन नवा दिलासा,
अनोळख्या वळण वाटेवर,
तुझी वाट पहाण्या,
मी हा उभा असा....

रोज फिरुन नवी चाहुल,
रोज फिरुन नवा कानोसा,
पैंजणांची रुणझुण ऐकण्या,
खिडकीत अधीर,
मी हा उभा असा....

रोज फिरुन नवी उभारी,
रोज फिरुन नवा कवडसा,
धुरकटलेली छबी न्याहाळत,
मी हा उभा असा....

रोज फिरुन नवी प्रतिक्षा,
रोज फिरुन उमाळा जरासा,
ओंजळीतले अश्रु लपवित,
मी हा उभा असा....

रोज फिरुन नवा गंध,
रोज फिरुन नवा आडोसा,
मोगर्‍याच्या दरवळात कोमेजलेला,
मी हा उभा असा....

रोज फिरुन नवा किनारा,
रोज फिरुन वाळुचा स्पर्श नवासा,
सागर लाटांचा मेळ पहात,
मी हा उभा असा....

रोज फिरुन नवा श्वास,
रोज फिरुन सहवास हवासा,
तुझ्या विस्कटलेल्या,
बटांमध्ये तुला शोधीत,
मी हा उभा असा....

आता फिरुन कधी स्वप्नं नाही,
आता फक्त एक दिर्घ उसासा,
तुझ्या आठवणींना उराशी कवटाळीत,
मी हा उभा असा....
मी हा उभा असा....

नंदू

ती दोघं...

बावरलेल्या त्या प्रियेने,
त्याच्या मुखचंद्राकडे पाहीले,
चांदणी बनुन ह्रदयपुष्प,
चंद्राच्या पायी वाहीले....

त्याने ही तिचे मुखकमल,
त्याच्या ओंजळीत भरुन घेतले,
चंद्र बनुन प्रितीचे दान,
चांदणीच्या ओटीत घातले....

चंद्र चांदणीचे मनोमिलन,
त्यांनी अनिमिष नेत्रांनी पाहीले,
गुंफताच त्यांचे हात हाती,
श्वास श्वासातच गुंतुन राहीले....

त्या अनोळखी पायवाटेवर,
दोघांची पावले एकत्र उमटली,
त्या अंधार्‍या माळरानात ही,
चांदणी रात्र प्रगटली....
चांदणी रात्र प्रगटली....
नंदू

आकर्षण

हे आयुष्य किती,
विलक्षण आहे,
अधिरलेल्या धरणीला ही,
वरुणराजाच्या आगमनाचे,
आकर्षण आहे....

हे आयुष्य किती,
विलक्षण आहे,
फेसाळणार्‍या लाटांना ही,
किनार्‍याचे आकर्षण आहे....

हे आयुष्य किती,
विलक्षण आहे,
फितुर लोचनांना ही,
आतुर ह्रदयाचे आकर्षण आहे....

हे आयुष्य किती,
विलक्षण आहे,
निसर्ग राजाला ही,
जलभरल्या मेघांचे,
आकर्षण आहे....

हे आयुष्य किती,
विलक्षण आहे,
सळसळणार्‍या सरीतेला ही,
उधानलेल्या सागराचे,
आकर्षण आहे....

हे आयुष्य किती,
विलक्षण आहे,
ओळखीच्या वाटेला ही,
अनोळखी पावलांचे,
आकर्षण आहे....

हे आयुष्य किती,
विलक्षण आहे,
तहानलेल्या चातकाला ही,
पाण्याच्या एका थेंबाचे,
आकर्षण आहे....

नंदू

रितेपण

तेव्हा तुझे रितेपण,
मला अधिक जाणवते,
जेव्हा तुझी छबी ही,
माझ्या स्वप्नांतुन दुरावते....

तेव्हा तुझे रितेपण,
मला अधिक जाणवते,
जेव्हा तुझ्या केसांची बट,
मला रुसुन खुणावते....

तेव्हा तुझे रितेपण,
मला अधिक जाणवते,
जेव्हा तुझे नाजुक ह्रदय,
माझ्या ह्रदयाशी ओणावते....

तेव्हा तुझे रितेपण,
मला अधिक जाणवते,
जेव्हा ती काळरात्र,
मला छद्मीपणे हिनवते....

तेव्हा तुझे रितेपण,
मला अधिक जाणवते,
जेव्हा तुझ्या श्वासांची लकेर,
माझ्या श्वासांना भैरवी सुनावते....

आताशा तुझे रितेपण,
मला प्रकर्षाने जाणवते,
जेव्हा तुझी तसबीर ही,
रक्त आसवांनी पाणावते....


नंदू

"तीळ"

तुझ्या गालावरचा तो,
एक नटखट तीळ,
कधी नव्हे तो माझ्या,
ह्रदयाला घाली पीळ....

तुझे हासणे लोभसवाणे,
ते माझे चित्त चिरत जाणे,
तु लटकेच लाजताना मात्र,
माझ्या पावलांना बसते खीळ....

तुझ्या भुरभुरणार्‍या केसांशी,
ते अवखळ वार्‍याचे खेळणे,
तुझ्या गालावरचा तो तीळ,
खेळे ह्रदयाशी खेळ जीवघेणे....

आताशा तो तीळही नाही,
अन तो वार्‍याचा खेळही नाही,
तो तीळ जाताना पाडुन गेलाय,
माझ्या ह्रदयाला जणु भोके काही....
नंदू

कधीतरी मी आले होते...

कधीतरी मी आले होते,
तुझ्या स्वप्नांत विहरले होते,
कधीतरी तुझ्या स्वप्नांचे भावविश्व,
माझ्या येण्याने बहरले होते....

कधीतरी मी आले होते,
तुझ्या ह्रदयी बागडले होते,
कधीतरी तुझ्या ह्रदयाचे दार,
माझ्या साठी उघडले होते....

कधीतरी मी आले होते,
तुझ्या लोचनी सामावले होते,
स्वप्नाळु ते नयन तुझे,
माझ्या जाण्याने पाणावले होते....

कधीतरी मी आले होते,
तुझ्या जीवनी एकरुप झाले होते,
जीवनाच्या पाऊलवाटेवर चालताना,
तुझ्यासंगे बिनघोर वावरले होते....

कधीतरी मी आले होते,
तुझी जीवन संगीनी झाले होते,
डाव अर्ध्यावर सोडुन जाताना,
विरह वेदनेत माझी मीच न्हाले होते....

कधीतरी मी आले होते,
हे तुला आता आठवतेय का रे,
का तु मोडुन टाकलेस ते,
माझ्या आठवांचे भावविश्व सारे....

मला माहीत आहे जाळत असेल,
तुला आपल्या दोघांचे नाजुक नाते,
पण आठवत असेल ना तुला...?
तुझ्या जीवनी...............
कधीतरी मी आले होते....
नंदू

मला आपलं वाटे...

मला आपलं नेहमी वाटे...तुझा जीव,
माझ्या वाटेकडे लागलेला असतो,
हिरमोड झाला तेव्हा...जेव्हा कळलं,
मी तुझ्या खिजगणतीत ही नसतो....

मग ते मला पाहुन लाडिक हसणं,
ओठांच्या पाकळीचं चंबु करणं,
गच्चीवरती मला चोरुन भेटणं,
सारं खोटं होतं तर...हे आठवलं की,
माझा मीच ओशाळवाणं हसतो....

आसवांना आवरायचा प्रयत्न करतो,
स्वतःला सावरायचा प्रयत्न करतो,
पण तुझ्या पैजणांच्या चाहुलीने मात्र,
अगदी मनाशी ठरवुन ही रोज फसतो....

आताशा तुझे रोज दर्शन होत नाही,
चाळीचा कठडा ही रिकामाच असतो नाही,
अचानक....हाती तुझी लग्न पत्रिका पडते,
अन काळजात वेदनेचा काटा घुसतो....


नंदू

निरोप

गालीचे हासु तुझ्या,
ओठी होते फुलले,
केसांचे थवे तुझ्या,
खांद्यावर रुळले,
मनापासुन वाटत होते,
जरा जवळी तुला घ्यावे,
पण चंचल मन माझे,
होते जरा बावचळले....

तुलाही काही सांगायाचे,
होते मला कळले,
ओठांवरले भाव तुझ्या,
होते डोळ्यांत तरळले,
निशःब्द भावना सार्‍या,
तुझा चेहरा सांगत होता,
आतुरले मन तुझे कसे,
होते जरा गोंधळले....

भारावलेल्या भावनांनीच,
दोघांनी निरोप होता घेतला,
पुन्हा केव्हा भेट होईल,
म्हणून हात हातातला सुटला,
मागे वळुन पाहताना,
माझ्या ह्रदयाने जाणीले,
हलकेच दोन अश्रु,
तुझ्या गाली होते ओघळले....
नंदू

मोहोळ...

ह्रदयाचं पुस्तक तुझ्या,
मी पुन्हा पुन्हा होतं वाचलं,
प्रत्येक पानावर आठवणींचं,
मोहोळ होतं साचलं.....

केवड्याचं फुल होतं सुकलं जरी,
आठवणींचा दरवळ होता कायम,
गुलाबाचे काटे काहीसे मृदु भासले,
विरह वेदनांनीच अधिक होतं बोचलं.....

तु पाठमोरी जात असताना,
मी वेड्यागत पहात बसलो,
माझ्याच फाटक्या नशीबावर,
उद्वीग्न पणे होतो हसलो.....

आता विरहाचीच साथ होती,
लोचनी वेदनांची बरसात होती,
विदिर्ण ह्रदय माझं,
मरण्या आधीच होतं खचलं.....
नंदू

ती कविता माझी झाली...

मी सरळ मार्गाने जात होतो,
तिच आडवळणाने आली,
शब्द शब्द ऐसे स्फुरले की,
ती कविता माझी झाली....

वेड्या शब्दांनी वाक्य घडवलं,
मनातलं माझ्या कवन स्फुरलं,
व्यथा अंतरीची कागदी उतरली,
माझ्याही नकळत कशी कोण जाणे,
ती कविता माझी झाली....

रक्तबंबाळ ह्रदय झाले होते,
ह्रदयात टोचले वेदनांचे भाले होते,
त्या कलमालाही वेगळीच धार आली,
मला न जुमानता,
ती कविता माझी झाली....

मित्र मैत्रीणींच्या कौतुकास पात्र,
शब्द ही होते माझे जोडीदार मात्र,
काहींना त्यावर टिकेची घाई झाली,
पण का कुणास ठाऊक,
ती कविता माझी झाली....

आताशा मलाही करमत नाही,
तिच्या वाचुन काही सुचत नाही,
अन सुचलं तरी,
शब्दांनाच झालेली असते घाई,
पहा एकेक चारोळी ही,
अशी काही सुसाटत गेली,
की क्षणभराची माझी कल्पना,
माझ्या आयुष्यभराची,
सखी होऊन गेली....

डोक्याच्या आडवळणाने आलेली ती,
ह्रदयाच्या सरळमार्गावर कधी आली,
कळलेच नाही माझे मला कधी,
पण एक मात्र खरं मित्र हो,
ती कविता माझी झाली....
नंदू

का....?

विझलेल्या माझ्या क्षणांना,
तुझ्या आठवणींचे निखारे,
पुन्हा शिलगावतील का....?
आसुसलेल्या माझ्या कानांना,
तुझ्या पैजणांचे झंकार,
पुन्हा रिझवतील का....?
फाटलेलं हे आभाळ माझं,
ठिगळं लावुन ही शिवलं जाईना,
आपल्या ऋणानुबंधाच्या,
हळुवार धाग्यांनी ते,
पुन्हा कधी शिवलं जाईल का....?
मी ही इथे उदास भ्रमर जसा,
तु ही हिरमुसलेली गुलाब कळी,
प्रितीच्या बरसणार्‍या धारांनी,
ह्रदयीची फुलबाग फुलवता येईल का....?
मनीची ही घालमेल माझ्या,
कोणा कधी...,कशी सांगु मी,
पाझरणार्‍या आसवांना माझ्या,
जागीच थोपवता येईल का....?
जागीच थोपवता येईल का....??
जागीच थोपवता येईल का....???
नंदू

अशांत

भावना माझ्या जाणुन घे कधी,
हे माझ्या अंतरीचा भाव सांगतो,
दरवळ तुझ्या आठवणींचा,सतत,
माझ्या श्वासात दरवळत असतो....

अथांग सागर ही शांत भासतो,
मी ही एकांती सैरभैर असतो,
माझ्या प्रत्येक श्वासातला गंध,
क्षणोक्षणी तुलाच शोधत असतो....

गतस्मृतींना आठवत त्या,
शांत किनारी एकटाच बसतो,
पण तुझ्या गजर्‍याचा सुगंध,
माझ्या भोवती घुटमळत असतो....

आज तु नाहीस पण मी आहे,
तो सागर ही शांत शांत आहे,
त्या किनार्‍यावर राहीलेलं,
माझं मन मात्र कसं अशांत आहे....
कसं अशांत आहे........................
 नंदू