Saturday, August 27, 2011

कधी तु....

कधी तु.....
वीज बनुन कोसळतेस,
कधी तु.....
पावसाच्या थेंबांतुन गळतेस,
कधी तु.....
अश्रु बनुन ओघळतेस,
कधी तु.....
आठवणींत येऊन छळतेस,

कधी तु.....
भासतेस पौर्णिमेच्या चांदण्यांत,
कधी तु.....
असतेस अंगठीच्या कोंदणात,
कधी तु.....
दिसतेस तुळशी वृंदावनात,
कधी तु.....
हसतेस मंद हवेसारखी कुंद वनात,

कधी तु.....
प्राजक्त बनुन अंगणात,
कधी तु.....
प्रारब्ध म्हणून प्राक्तनात,
कधी तु.....
गहिवरलेल्या भावनांत,
कधी तु.....
निरागस बछड्यांच्या रिंगणात,

तु.. तु.. तु आणि तु,
तुझा तीळ,तुझी शीळ,
तुझी खळी,जशी चाफेकळी,
तुझे भुरभुरणारे केस,लावती वार्‍याशी रेस,
सारे सारे कसे आपले वाटु लागलेत....

कधी पुस्तकाच्या पानात,
कधी घनदाट रानात,
कधी आवखळ वार्‍यात,
कधी खळाळणार्‍या झर्‍यांत,
अन आताशा तर स्वप्नांत सुद्धा,
मला वरचेवर भेटु लागलेत....

कधी तरी तु मला भेटशील,
कधी तरी पराग कणांत असशील,
कधी माझ्या प्रित चौकटीत बसशील,
का,नेहमी सारखीच स्वतःवर रुसशील...?
तुझ्या कडे असेल ही ह्याचे उत्तर,
पण मी मात्र निशब्द अन निरुत्तर....












नंदू

वेड व आकर्षण...

तुला वेड चंद्राचं,
अन मला चांदण्यांचं...
तुला आकर्षण सुर्याचं,
अन मला किरणांचं...

तुला वेड,
चमकणार्‍या सौदामिनीचं,
अन मला,
कोसळणार्‍या जलधारांचं...
तुला आकर्षण,
बरसणार्‍या टपोर्‍या थेंबांचं,
अन मला,
टप टप पडणार्‍या गारांचं...

तुला वेड,
पहाटेच्या दवबिंदुंचं,
अन मला,
ते झेलणार्‍या तृणपातीचं...
तुला आकर्षण,
सोनसळी पहाटेचं,
अन मला,
चंदेरी रातीचं...

तुला वेड,
शांत दिसणार्‍या सागराचं,
अन मला,
खळाळणार्‍या लाटांचं...
तुला आकर्षण,
मळलेल्या पाऊलवाटेचं,
अन मला,
नव नव्या वळण वाटांचं...

तुला वेड,
फुलांनी बहरलेल्या प्राजक्ताचं,
अन मला,
प्राजक्ताच्या दरवळीचं...
तुला आकर्षण,
बेधुंद निसर्गाचं,
अन मला,
त्याने ल्यालेल्या हिरवळीचं...

तुला वेड,
रंगीबेरंगी फुलांचं,
अन मला,
त्या फुलांच्या गंधाचं...
तुला आकर्षण,
नात्यातल्या रेशीमगाठीचं,
अन मला,
रेशमी नात्यातल्या ऋणानुबंधाचं...

तुला वेड,
सप्तरंगी इंद्रधनुचं,
अन मला,
त्यातल्या विविधरंगी छटांचं...
तुला आकर्षण,
माझ्या भव्य कपाळाचं,
अन मला,
तुझ्या वार्‍यासंगे खेळणार्‍या बटांचं...

तुला वेड,
माझ्या निळ्याशार डोळ्यांचं,
अन मला,
तुझ्या गाणार्‍या गोड गळ्याचं...
तुला आकर्षण,
माझ्या भरदार छातीचं,
अन मला,
तुला पडणार्‍या नाजुक खळ्यांचं...

तुला आकर्षण,
माझी आवड आपल्या,
ह्रदयी जोपासण्याचं,
अन मला,
तुझी नावड ही,
आपल्या मनी जपण्याचं...
तुला वेड,
माझी वेड्या सारखी,
वाट पहाण्याचं,
अन मला,
तुझी वाट पहात,
भर उन्हात ही तापण्याचं...

तुझं आकर्षण अन माझ वेड,
एकमेकांना पुरक असंच होतं,
कुणास ठाऊक प्रेमाच्या ह्या खेळात,
सर्वांचं हे अगदी तसंच होतं....???











नंदू

Thursday, August 18, 2011

"तु"...

तलावाकाठी,
त्या रंकाळ्याच्या,
पायथ्यापाशी,
त्या पन्हाळ्याच्या,
आठवतंय का,
झुलवत होतो,
दोर्‍या आपण,
त्या पारंब्यांनी,
बांधलेल्या झोपाळ्याच्या....

अर्ध्या चड्डीतला,
मी बावळट गबाळा,
चढुन जायचो बघ,
झरझर पन्हाळा,
तुला भापवण्यासाठीच,
मी घ्यायचो तो अवतार,
पण खाली उतरे पर्यंत,
गळालेलं असायचं,
अवसान पार....

परकर पोलक्य़ातलं,
तुझं ते अजब ध्यान,
दोन वेण्यांमधला गजरा,
मात्र दिसायचा खुप छान,
सागरगोट्या खेळताना,
तुझं ते माझ्याकडे पहाणं,
मी मात्र पाहीलं की,
लाजत लाजत,
जमिनीवर पायाच्या,
अंगठ्याने रेघोट्या काढणं....

नाही म्हटलं तरी,
मला ते समजलं होतं,
ह्रदयीच्या स्पंदनातुन,
बरचसं उमजलं होतं,
अबोल जरी असले,
ओठ तुझे तरी,
डोळ्यांतुन तुझ्या मला,
ते बरोबर गवसलं होतं....

आज राहुन राहुन,
मला ते आठवतंय,
गतस्वप्नांना ह्रदयात,
हलकेच साठवतंय,
मनात साचलेल्या,
आठवांच्या जळमटांना,
ओघळणार्‍या आसवांनी,
अलगद हटवतंय....

आज तो रंकाळा ही,
तसाच आहे,
तो पन्हाळाही,
तसाच आहे,
त्या खेळातली,
"तु" मात्र नाहीस,
सुर पारब्यांनी,
सजवलेला झोपाळा ही,
तसाच आहे....








नंदू

मैत्रीचं नातं...

वार्‍याच्या वेगाने मन जेव्हा,
इतस्ततः भिरभिरु लागतं,
सालं नेमकं तेव्हाच आठवणींचं,
वासरु बेभानपणे उंडारु लागतं....

विजेच्या वेगाने गतस्मृति,
जेव्हा मनावर कोसळु लागतात,
गहिवरुन पडणार्‍या जलप्रपाता सम,
अश्रु ही डोळ्यांवाटे ओघळु लागतात....

ह्रदयी पेटलेला वडवानल,
जेव्हा शमता शमत नाही,
सालं विस्कटलेलं मन तेव्हा,
कुठल्याच गोष्टीत रमत नाही....

हे असं का होतं म्हणून,
मैत्रीचं नातं जोर जोराने,
आक्रंदन करु लागतं,
सालं दुष्ट विचारांचं वादळ,
नेमकं तेव्हाच मनात,
घोंघावु लागतं....












नंदू

Saturday, August 13, 2011

"पहिली भेट"....

एका सुंदर वळणावर,
त्या दोघांची अखेर,
भेट झाली,
ह्रदयातली भावना मग,
अधिकच दाट झाली....

तिच्या नयनांची भाषा,
त्याला ही होती कळली,
त्याच्या हसर्‍या चेहर्‍यावर,
तिचीही नजर होती खिळली....

अनिमिष नेत्रांनी दोघांनी,
एकमेकांना पाहीलं,
पहिल्या भेटीचं मैत्र-पुष्प,
एक दुसर्‍याच्या ओंजळीत वाहीलं....

मंतरलेले ते हळवे क्षण,
त्याने ह्रदयी ठेवलेत साठवुन,
तिने मात्र तेच क्षण,
स्वप्नी ठेवलेत गोठवुन....

मंतरलेला तो दिवस,
संपुच नये असं वाटलं,
नेमकं त्याच वेळी आभाळी,
काळ्या मेघांचं मळभ दाटलं....

मग श्रावणसरी ही बेभान,
होऊन कोसळु लागल्या,
तशा त्याच्या मनीच्या भावना,
जलधारा बनुन तिच्या,
डोळ्यावाटे ओघळु लागल्या....

आता मात्र त्यांना,
परतणं भाग होतं,
श्रावणातले ते पहिल्या,
वहिल्या भेटीचे क्षण,
त्यांच्या साठी,
स्वप्नांतलं जग होतं....










नंदू

"माणुसकी"....

पवनेच्या पाण्यावरुन,
राजकारण कमालीचे रंगले,
पोलीसांच्या खांद्यावर,
बंदुक ठेऊन गोळ्या मारण्यात,
राज्यकर्ते चांगलेच दंगले....

पवना काठचा धोंडी,
बघा आक्रमक झाला,
हक्काच्या पाण्यासाठी,
रस्त्यावर उतरला,
राज्य कर्त्यांचा सुद्धा,
संयम किंचित सुटला,
बेछुट सुटणार्‍या गोळ्यांवर,
निरपराध शेतकर्‍याचाच,
जीव कोरला गेला....

मग गल्ली पासुन,
दिल्ली पर्यंत राजकारण,
भलतेच रंगले,
पण त्या भुमिपुत्राच्या,
पिल्लांचे स्वप्नं मात्र,
काचे सारखे दुभंगले....

"आरक्षण"चा वाद पहा,
इथे भलताच तापतोय,
इथे प्रत्येक जण,
दुसर्‍या वर कुरघोडी,
करु पाहतोय....

पाला पाचोळ्या सम,
विखुरल्या गेल्यात इथे,
अनेक जाती पाती,
अरे माणसं आहोत आपण,
रानटी जनावरं नाही,
मग माणुसकी हरवलेल्या,
या जगात जपुया ना,
थोडीसी "माणुसकीची नाती".....







नंदू

"माय"...

फाटंच्या पारी,
फाटक्या वाकळातुन,
मायची हाक ऐकु आली,
आन तिच्या उबदार,
कुशीची आठव होऊन,
ती वाकळ बी,
जराशी आळसावली....

सुर्यदेवाचे घोडे आजुन,
जमीनीवर आले बी नव्हते,
पर माझ्या मायचे हात,
मातुर यंत्रावानी राबत व्हते....

माय माझी तशी अडानी,
पर ह्या हेवारशुन्य जगानं,
बनवली तिला श्हानी,
चार घरची धुनी भांडी करुन,
बांधली गाठीला तिनं,
चार नाणी....

मायनं कधी कुनापुढं,
हात न्हाई पसरला,
माय सांगाती संसार कराया,
माझा "बा" बी ईसरला,
त्या दारुनं त्येचा,
पार माकड केला,
आन सोन्यावानी संसाराचा,
बट्ट्याबोळ झाला....

पर माझी माय मातुर,
खमकी निघाली,
बेकार नवर्‍यामुळे,
ती बी हुशार झाली,
जवा बी आमच्यावर,
काय बी मुसीबत आली,
तेचा मुकाबला कराया,
"सिंधुताईं"वानी उभी राह्यली....

अशे किती तरी संसार,
उभारुन "सिंधुताई"सार्‍या,
जगाची "आई" झाली,
तिचाच आदर्श,
डोळ्यांम्होरं ठेऊन,
माझी माय,
माझ्या साठी,
"सिंधुताई" झाली....

नंदू










 (महाराष्ट्राची "आई" सिंधुताई सपकाळ यांना समर्पित)

Wednesday, August 10, 2011

श्रावण सरी...

पाहीला ना...
श्रावणातला तो मनसोक्त,
बरसणारा पाऊस,
की मन ही म्हणतं माझं,
ए वेड्या...इतका हळवा नको होऊस....

पाहीली ना...
श्रावण सरींमध्ये आनंदलेली,
ती पाने,फुले,पशु अन पक्षी,
मन कसं म्हणतं माझं...पहा,
निसर्गाने कोरलेली धरेच्या,
मनावरली सुंदर हिरवी नक्षी....

पाहीला ना...
पिसारा फुलवत नाचणारा,
तो रोमांचित मोर,
मन कसं होऊन जातं माझं,
नवथर तरूणी सारखं भाव विभोर....

पाहीले ना...
डोंगरांच्या कुशीतुन झुळुझुळु,
वाहात जाणारे अवखळ झरे,
मन कसं म्हणतं माझं.. बघ,
जणु काही पट्टीचे गवय्ये,
मेघ मल्हार गाणारे....

पाहीली ना...
तुझी आकृति श्रावणात,
पावसाचे तुषार अंगावर झेलणारी,
मन लगेच म्हणतं माझं... बघ,
जशी अल्लड,अवखळ सरीता,
सागराच्या बाहुपाशात विरघळणारी....

आठवले ना आता ते सारे,
तुझ्या सोबतीनं घालवलेले,
प्रितीने ओथंबलेले क्षण,
काहीसं गहिवरुन येतं गं,
त्या श्रावणात बरसणार्‍या,
पावसाला पण....

पाहतो ना...
आता ही त्या बरसणार्‍या,
उन्मुक्त श्रावण सरी,
मन हळुवारपणे म्हणतं माझं,
डोळ्यांना पाझरु देऊ नकोस,
बाबा,आता तरी....












नंदू

Tuesday, August 2, 2011

"श्रावण" बरसणारा....

वळणा वळणाची,
वाट काढीत,
नदी ही सागराकडे,
पळु लागली,
वर मेघ "मल्हार"
गाऊ लागले,
तशी पावसाची पावले,
अलगद धरणीकडे,
वळु लागली....

गार वारा खट्याळपणे,
झुलणार्‍या पानांशी,
झोंबु लागला,
मग तृणपात ही,
पावसाच्या थेंबाशी,
मनसोक्त खेळु लागली....

मधुनच पावसाची एक,
जोरदार सर आली,
अन मग,
एका मागोमाग एक,
आठवणींची माळ,
आपसुकच डोळ्यांतुन,
गळु लागली....

ती पावसाची आठवण,
ती अंतरीची साठवण,
भावनांच्या भाऊगर्दीत,
त्याच्या ह्रदयालाच,
छळु लागली....

ओल्या चिंब ह्रदयानेच,
मग त्याची पावले ही,
तिला शोधण्यासाठी त्या,
बरसणार्‍या श्रावणसरींकडे,
वळु लागली....

बरसणारा तो श्रावण ही,
काहीसा लाजुन चुर्र झाला,
आताशा नजरेची परिभाषा,
त्या बरसणार्‍या श्रावणाला ही,
कळु लागली....










नंदू

दिवस मोजायचं सोडलंय...

बर्‍याच दिवसां पासुन मी,
दिवस मोजायचंच सोडलंय,
रात्रीच्या दिवा स्वप्नांना,
दिवसाच्या उजेडा पासुन तोडलंय....

अविरत राबणार्‍या,
हातांचा दोष काय हो..?
पण आता त्याच हातांनी,
कष्ट करायचंच सोडलंय,
कारण आजकाल नशिबानं,
जणू कष्टाशी नातंच तोडलंय....

आतुर वाट पहाणार्‍या,
डोळ्यांचा दोष काय हो..?
पण आता त्यांनी ही,
घड्याळाकडे बघायचंच सोडलंय,
कारण आजकाल घड्याळानंही,
जणू काट्यांशी नातंच तोडलंय....

निष्पाप जीवन जगणार्‍या,
जीवांचा दोष काय हो..?
पण आताशा त्यांनी ही,
मोकळा श्वास घेणंच सोडलंय,
कारण आजकाल श्वासांनीही,
जणू आत्म्याशी नातंच तोडलंय....

हो.....,बर्‍याच दिवसां पासुन,
मी ही दिवस मोजायचं सोडलंय,
स्वप्न भासणार्‍या आठवणींना,
भयान वास्तवा पासुन तोडलंय....












नंदू

"मॅनेज" केलाय...???

आजकाल सर्वच देवांवर,
दुधातुपाचा अभिषेक होतोय,
सार्‍या जनतेला अन्न,
देणारा बळीराजा मात्र,
अन्न पाण्याविना,
उपाशी तडफडतोय....

आजकाल जो तो देवांना,
सोन्या चांदीने मढवतोय,
सार्‍या जगताच्या अंगावर,
वस्त्र घालणारा गिरणी,
कामगार मात्र,
उघडा,नागडाच भटकतोय....

आजकाल देवांचा वावर,
आलिशान कोठीत होतोय,
परक्यांच्या डोक्यावर छप्पर,
घालणारा भुमिपुत्र मात्र,
हक्काच्या घरासाठी,
अहोरात्र वणवण करतोय....

मोर्च्यात वावरणारे पांढरपेशे,
सकाळी त्यांच्या नावाने,
गळे काढताहेत,
रात्र झाली की स्कॉच सोबत,
त्यांच्याच मढ्यावरचे लोणी,
चखना म्हणून चाटताहेत....

कुणास ठाऊक हा सगळा,
त्या परमेश्वराचा खेळ चाललाय,
की ह्या भांडवलदार पांढरपेश्यांनी,
"त्या"ला ही "मॅनेज" केलाय...???

नंदू