Monday, February 14, 2011

ट्रॅफिक पोलिसाला जाळले, माझे काय गेले?

विश्वास नांगरे पाटील - शनिवार, ६ नोव्हेंबर २०१०(पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण)   बुधवारी पहाटे ट्रॅफिक डी. वाय. एस. पीं.चा फोन आला. हवालदार अनिल ऐतवडेकरांचा मृत्यू झाल्याची त्यांनी बातमी दिली. माझ्या कुटुंबातील व्यक्ती दगावली होती. मी सुन्न झालो. मनाला असंख्य सुया टोचल्याच्या वेदना झाल्या. एका रिक्षावर कायदेशीर कारवाई केली म्हणून पिसाळलेला रिक्षाचालक बेसावध हवालदारावर पाठीमागून पेट्रोल टाकतो आणि स्वत:चा पेटवलेला सदरा त्यांच्या अंगावर फेकून पोलीस हवालदाराचा जाळून खून करण्याचा प्रयत्न करतो. रुग्णालयात दाखल केलेल्या ऐतवडेकरांना उच्च मधुमेह, टी.बी.ने आधीच ग्रासले आहे. मात्र आगीने जळालेल्या कातडीने त्यांच्या फुप्फुसातून कार्बन साचतो व ते दिवाळीच्या मंगलदिनी पहाटे अखेरचा श्वास घेतात. ‘रात्र सरू दे, अंधार सरू दे, नव्या स्वप्नांचा, नव्या किरणांचा नंदादीप जळू दे’ असा संदेश देणारी दिवाळी ऐतवडेकर कुटुंबीयांसाठी काळाकुट्ट अंधार घेऊन का आली?एका निर्ढावलेल्या गुन्हेगाराकडून एका कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचाऱ्यास जिवंत जाळण्याची घटना घडते आणि समाजमन मात्र थंड, शांत, शुष्कपणे त्या घटनेकडे उदासीनतेने पाहते. पोलिसी अत्याचाराची क्षुल्लक घटना घडली तरी एरवी आवेशाने फुत्कार काढणाऱ्या एकाही मानवाधिकार संघटनेने ‘ब्र’ही काढला नाही. पोलिसातल्या माणसाबद्दल सहानुभूतीची चर्चाही नाही, कुजबूजही नाही. जो पोलीस घडय़ाळाकडे न पाहता रात्रंदिवस कायदा व सुव्यवस्था चोख ठेवण्यासाठी अविरतपणे काम करतो. अपुरे, मनुष्यबळ, साधनसामग्रीची कमतरता, कामाच्या वेळांची अनियमितता, गुन्हेगारांशी रोज सामना आणि कौटुंबिक अस्वास्थ्य या दुष्टचक्रात अडकून तो अनेक व्याधी, विकार आणि आजारांचा बळी ठरतो, तरीही तो वेळप्रसंगी दंडुक्यांनी दहशतवाद्यांशी लढतो. तो समाजाला एवढा अप्रिय का? खरे तर समाजाला त्याचे ऋणी असले पाहिजे; पण तो त्यांच्या शिव्याशापाचा धनी का? त्याला का कोणी आपला मानत नाही? सिनेमे, टेलिव्हिजन त्याच्यामागे काळासारखे हात धुवून का मागे लागतात आणि दृकश्राव्य माध्यमे का विणतात त्याच्या बदनामीचे धागे? न्यायालय, सरकारी पक्ष वेळ मिळेल तेव्हा त्याला झोडते. काय कारणे असू शकतील, या सर्व प्रश्नांची? खरे तर सामान्य लोकांना अवैध गोष्टींमुळे, गुन्हेगारी वृत्तीच्या दादांमुळे, वाहतुकीमधील बेशिस्तीमुळे रोजच्या जीवनात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. ज्यावेळी एखाद्याचे रक्त सांडते किंवा संकटामध्ये अश्रू येतात त्या वेळी त्याला पोलीसदादाच आठवतो. वास्तविक कुठल्याही संकटात असताना परमेश्वरानंतर माणसाला पोलिसाची आठवण होते ही वस्तुस्थिती आहे. असे असताना सर्वसामान्य जनतेला पोलिसांबाबत आपुलकी नसल्याचे कारण काय असावे?पोलीस दलाने शंभर चांगली कामे केली तरी एक नकारार्थी काम करावे लागते. लोकांच्या स्वैर स्वातंत्र्यावर दंडुका ठेवून र्निबध आणावे लागतात. अनेकदा दोन गटांमध्ये भांडणे असतात त्या वेळी दोन्ही गटांना आपलेच बरोबर आहे, असे वाटत असते. सत्य असत्याची शहानिशा करून पोलीस कारवाई करतात. त्यामुळे एक गट नाराज होत असतो. पोलिसांना अटक करण्याचे अधिकार दिलेले आहेत. त्यामुळे ज्या लोकांवर कारवाई होते ते नाराज होतात.भारतीय समाजमनावर चित्रपटांचा व दृकश्राव्य माध्यमांचा मोठा पगडा आहे. पोलीस ‘भूमिका’ असल्याशिवाय ‘अपवाद’ म्हणूनदेखील आपल्याकडे सिनेमा बनत नाही; परंतु बहुतांश चित्रपटांमध्ये पोलिसांना खलनायक म्हणून दाखविले जाते. एखादा पोलीस अधिकारी ‘हीरो’ असला तरी त्याच्याबरोबर त्याचे खाते मात्र नकारात्मक पद्धतीने दाखविले जाते.याशिवाय माध्यमांमध्येसुद्धा आपल्याकडे ‘गुन्हेगारी’च्या बातम्यांना अतिरंजित स्वरूपात दाखविण्याचा कल असतो आणि नकळत हीरोचा दर्जा दिला जातो. पोलिसांनी केलेल्या सकारात्मक व प्रभावी कामगिरीला मात्र दुर्दैवाने ‘न्यूज व्हॅल्यू’ कमी दिली जाते. त्यामुळे निश्चितपणे  समाजमनावर प्रतिकूल परिणाम होतो. पोलीस हादेखील समाजाचा एक घटक आहे. त्यातही चांगल्या, वाईट वृत्ती असतात. कामाचा ताण, डय़ुटीच्या वेळेची अनियमितता यामुळे पोलिसांकडून काही वेळेस मानवाधिकाराचे उल्लंघन होते. मात्र या गोष्टींवरून विधिमंडळात व मीडियामध्ये खूप गदारोळ होतो. पोलीस हे ‘सॉफ्ट टारगेट’ आहे. त्यामुळे रोजच्या कामामध्ये, संयम, आत्मविश्वास व न्याय्य भूमिका ठेवून काम करताना होणारी कसरत पोलिसांसाठी जीवघेणी बनलेली आहे.गेल्या काही महिन्यांत आम्ही रिक्षावाल्यांचा बेशिस्तपणा व मुजोरी मोडायचा पुरेपूर प्रयत्न केला. वसईत त्याला विशेष करून प्रखर विरोध झाला. रिक्षावाल्यांनी बंद पाळला, रास्ता रोको केला. लोकांनीही पोलिसांना शिव्यांची लाखोली वाहिली. आम्हाला महाग पडते, रिक्षावाले आमच्या सोयीने कोठेही थांबतात, सीट्स कितीही घेतात; पण माफक भाडे आकारतात. आम्हाला त्रास नाही, तर मग पोलिसांची लुडबूड कशासाठी? असे अनेक प्रश्न निर्माण केले गेले; पण रोज होणारे अपघात, रस्त्यांची कोंडी पाहून आम्ही शिस्त लावण्यासाठी कारवाई चालूच ठेवली.एका ठाणे जिल्ह्णाात रोज अंदाजे तीन माणसे अपघातात दगावतात, अनेक जखमी होतात, पण त्याची प्रतिक्रिया कधीही उमटत नाही. ‘पिपात मेले ओले उंदीर, माना पडल्या मुरगळल्याविन’ या मर्ढेकरांच्या कवितेतील पिचलेल्या मुंबईकरांसारखे आम्ही पुन्हा त्या रिक्षाच्या खुराडय़ात चेंगरून बसायचे. अनेक अबलांचे विनयभंग लोचटपणे करणाऱ्यांचे कृत्य निलाजरेपणाने पाहत बसायचे. ‘रोज जगायचे व जगताना रोज मरायचे’ या दुष्टचक्रातून आम्ही कधी बाहेर येणार? ‘डोंबिवली फास्ट’मधील आपटेंसारखा आम्हाला राग केव्हा येणार आणि या सिस्टीममधल्या ‘वंगाळाला’ आम्ही कधी झुगारून लावणार? जर वेळेवर उपचार केले नाहीत तर आजचे दुखणे ही उद्याची मोठी व्याधी होणार आहे त्या व्याधीमुळे सामाजिक आजारपण निर्माण होणार आहे आणि मग त्यातून गटार तुंबल्यावर अनेक विषारी जीवजंतू तयार होतात, तसे महेंद्र केवटसारखे ‘विषाणू’ तयार होतील आणि जुजबी इलाज करून त्यांची कर्करोगासारखी होणारी विषारी वाढ आम्ही रोखू शकणार नाही.पण यावर इलाज करू पाहणाऱ्या यंत्रणा जर प्रामाणिकपणे झटत असतील तर त्यांना आम्ही प्रोत्साहन, पाठिंबा द्यायला नको का? मरिन ड्राइव्हवर रात्री नाकाबंदी करताना एका श्रीमंत बिघडलेल्या मुलीच्या आततायीपणाचा बळी ठरलेले उपनिरीक्षक शिंदे यांच्या अंत्यविधीस मी गेलो होतो. विवाहात ज्या पद्धतीने वधूला सजवतात, अशा पद्धतीने त्यांच्या पत्नीला अंत्यविधीच्यावेळी सजविले होते. त्या वेळी या भगिनीने आपल्या बांगडय़ा फोडून फोडलेला ‘टाहो’ आठवला की अजूनही मी दचकून जागा होतो. ऐतवडेकरांच्या पत्नीलाही त्यांच्या निधनाच्या धक्क्याने उच्चरक्तदाबाचा झटका आला. त्यांनाही रुग्णालयात दाखल करावे लागले. अनेक वेदना होत असतानाही सलाईन तोडून त्या स्मशानभूमीत ऐतवडेकरांची अंतिम भेट घ्यायला आल्या होत्या.या असहाय्य विधवांच्या वेदनांशी समाजमनाचे नाते आहे का? आम्ही पटकन हे विसरत तर नाहीना? विसरणे दूर रोजच्या रहाटगाडग्याच्या जीवनशैलीत क्षणभर हे कुठे तरी नोंद घेण्यासारखे तरी आम्हाला वाटते आहे का? जर नसेल तर एक कविता खूप बोलकी आहे. या कवितेतले शब्द आमच्या बेसावधपणाला, उदासीनतेला चपराक देणारे आहेत आणि समाजातील सुप्त राक्षसी वृत्तीच्या विळख्याची चाहूल देणारे आहेत.
‘यदी तुम्हारे घरके एक कमरे में आग लगी हो
तो तुम दुसरे कमरे में गा सकते हो क्या?
यदी तुम्हारे घरके एक कमरे में लाश सड रही हो
तो तुम दुसरे कमरे में सो सकते हो क्या?
यदि इसका तुम्हारा जबाब हाँ है,
तो मुझे तुमसे कुछ भी नही कहना है!

No comments:

Post a Comment