Wednesday, October 5, 2011

एक मोती....

ती म्हणाली,
धावु नकोस माझ्या मागे,
मी मृगजळ आहे....
तो म्हणाला,
हरकत नाही,
माझ्या साठी ते तुझ्या,
डोळ्यांतील काजळ आहे....

ती म्हणाली,
पळु नकोस माझ्या मागे,
मी बेभान वारा आहे....
तो म्हणाला,
काही हरकत नाही माझ्या,
बाहुंचा मोठा पसारा आहे....

ती म्हणाली,
पाठलाग करु नकोस माझा,
मी सळसळणारी सौदामिनी आहे....
तो म्हणाला,
काही हरकत नाही,ती माझ्या,
ह्रदयी रहाणारी भामिनी आहे....

ती म्हणाली,
वेड्या सारखं वागु नकोस,
मी जळणारी वात आहे....
तो म्हणाला,
काही हरकत नाही,हीच तर,
पतंग होण्याची सुरुवात आहे....

ती म्हणाली,
वेड्या,जरा शुद्धीवर ये,
ही खाच खळग्यांची वाट आहे....
तो म्हणाला,
घाबरु नको गं अशी,
माझ्या ही मनी प्रेम घनदाट आहे....

ती म्हणाली,
वेडा आहेस,
ऐकणार नसशील तर दे सोडुन....
तो ही म्हणाला,
हिम्मत असेल,
तर जा माझ्या ह्रदयी कोरलेलं,
तुझं नाव खोडुन....

डोळ्यांत साठलेलं पाणी,
लपवण्याचा तिने,
आटोकाट प्रयास केला,
त्याच वेळी त्याने,
तिच्या डोळ्यांतला एक मोती,
आपल्या ओंजळीत भरुन नेला....









नंदू

वेदना दोघांची...

प्राजक्त फुलतच होते,
प्रित जुळतच होती,
की,असह्य विरह वेदनेत,
ती दोघं होरपळतच होती....

प्रित आसवे गळतच होती,
पावले परतीला वळतच होती,
की,अहंकाराच्या वडवानलात,
ती दोन मने जळतच होती....

पुन्हा कधीही एकत्र न येण्याची,
सल ह्रदयी भळभळतच होती,
की,प्राक्तनातले भोग भोगण्यासाठी,
नजर देव्हार्‍यापाशी वळतच होती....









नंदू

बालपण...

कधीतरी लहान व्हावं,
असं वाटतं,
आईच्या कुशीत लोळावं,
असं वाटतं...

मैत्रीचा ओलावा नष्ट,
होऊ नये असं वाटतं,
बालपण माझ्यावर कधीच,
रुष्ट होऊ नये असं वाटतं...

मित्रांच्या डब्यात डोकवावं,
असं वाटतं,
मैत्रीचं पान वही मध्ये,
जाळी होई पर्यंत सुकवावं,
असं वाटतं...

रडु येई पर्यंत,
मास्तरांची छडी खावी,
असं वाटतं,
खेळताना खेळ आबाधुबीचा,
त्यात ही रडी यावी,
असं वाटतं...

आता मोठे झालो तरी त्या,
करवंदाच्या जाळीत लपावं,
असं वाटतं,
सरत्या आयुष्यात ही,
सुप्त मनातलं बालपण जपावं,
असं वाटतं....












नंदू

कविता....

कविता लिहायला घेतली,
पण लेखणी काही चालेना,
ह्रदयात डोकावयाचे म्हटले,
पण ह्रदयाचे दार काही खुलेना,
शब्द ही निःशब्द होऊन,
बसले होते रुसुन,
अन कागदाचे ही पान,
काही लेखणी वाचुन हलेना....

मग भावनांचा हलकल्लोळ,
काही थांबता थांबेना,
ह्रदयीचे दडपण माझ्या,
काही सरता सरेना,
आता काय करावे ह्या,
विवंचनेतच होतो की,
डोक्यातल्या विचारांचे वादळ,
काही हरता हरेना....

अनिच्छेने उठावं म्हटलं,
तर पाउल काही उचलेना,
वहीच्या पानावर अक्षरांचा,
बांध काही केल्या फुटेना,
लेखणीतली भावनांची शाई,
अशी का बरं आटावी....???
त्या लेखणीच्या वेदनेचे हे कोडे,
काही,काही,काही केल्या सुटेना....









नंदू

जखम...

जखम दिलीस,
व्रण ही दिलास,
काळजाचा तुकडा,
कापुन नेलास,
ओरखडा व्रणाचा,
जाता जाईना,
आताशा तो ओरखडाही,
जखमेला भिईना....

जखम भरली,
खपली धरली,
व्रण ही आता,
नाहीसा झाला,
स्वप्नांना ओरखडा,
धरुन राहिला,
श्वासांमध्ये आठवांना,
भरुन राहिला....

श्वासांना आठवतोय,
तो जखमेचा व्रण,
जखम ही काढतेय,
वेदनेची आठवण,
कातरलेल्या काळजाचा,
ठोकाच चुकलाय,
डोळ्यांत आसवांचा,
महापुर लोटलाय....









नंदू

काव्य झिरपलं...

रुक्ष जीणं,रुक्ष गाणं,
रुक्ष रंग,रुक्ष छटा,
त्याच त्याच नेहमीच्या,
मळलेल्या रुक्ष वाटा...

वाट वाकडी करुन नव्या,
वळणावर जावंसं वाटलं,
साला त्याच वळणावर,
नेमकं नवं आयुष्य भेटलं...

शब्द अन भावनांचा,
अनोखा संगम होत गेला,
गहिवरलेल्या स्वप्नांना,
गहीरे रंग देत गेला...

भावनांचा हलकल्लोळ,
सार्‍या अंगी वाढत गेला,
त्याच वेळी कलमाला ही,
वेगळाच रंग चढत गेला...

मनातल्या त्या भावनांनी,
अवघ्या भावविश्वाला व्यापलं,
बघता बघता कागदावर कसं,
एक रसरशीत काव्य झिरपलं....








नंदू

सॉरी अन ओके...

ती म्हणाली "सॉरी"
मला वेळच नाही,
तुझ्याशी प्रेम करायला,
तो ही म्हणाला "ओके"
मी ही तयार नाही,
तुझ्या समोर हरायला....

मनाशी पक्कं ठरवुन त्याने,
तिला प्रेम पाशात ओढलीच,
ती ही अगदी अलगद पणे,
त्याच्या प्रेमात पडलीच....

दोघांनी देवाच्या समोर,
प्रेमाच्या आणाभाका घेतल्या,
अग्नी देवतेला साक्षी ठेऊन,
सात फेर्‍या मारल्या....

तिच्याकडे वेळच वेळ असतो,
आता त्याच्या डोळ्यांत हरायला,
आताशा त्याच्याकडेच वेळ नसतो,
तिच्यावर क्षणभर प्रेम करायला....












नंदू