Monday, February 14, 2011

"आज पुन्हा"

आज पुन्हा भांडी रीकामीच राहीली,
आज पुन्हा चुली बंद झाल्या,
लालबागच्या वेशी वरल्या गिरण्या,
अवकाळीच कशा थंड झाल्या.....

आज पुन्हा भोंगे निशब्द झाले,
आज पुन्हा चिमण्या विझुन गार झाल्या,
मस्तवाल मालकांच्या टाचेखाली,
कित्येक ज्योती अवेळीच निमाल्या......

जमीन जुमला,दाग दागिना,
सावकाराच्या घशात असाच गेला,
दोन वेळची पडली भ्रांत घासाची,
डोकीवरचा आसरा फुंकला गेला........

आज पुन्हा जोडे कोर्ट कचेर्‍यात झिजले,
वण वण करुन अंग घामाने भिजले,
अंगावरचे काम ही मिळेनासे झाले,
सारे कुटुंब फक्त पाण्यावरच निजले.......

आज पुन्हा.... आज पुन्हा....
गिरणी कामगार मुंबापुरीतुन हद्दपार झाला,
त्याच जमीनी विकुन मालक मात्र गबर झाला,
आज पुन्हा आयुष्याची फरफट सुरु झाली,
कालचा लाखाचा पोशिंदा,आज उघड्यावर आला.....

टाळेबंदी,संप,बंद ज्यांनी ज्यांनी केले,
ते सगळे आपापल्या कर्माने मेले,
जे उरले ते सगळे हद्दपार झाले,
भांडवल शाहीचे उखळ पांढरे झाले,

आज पुन्हा नव्याने आठवले सारे,
कंठ दाटुन आला,मनी दाटले शल्य बोचरे,
राहुन राहुन सारखं वाटत राहीले,
लालबाग,परळचे वैभव लयास गेले रे,
लालबाग,परळचे वैभव लयास गेले रे.........

   










  नंदू

No comments:

Post a Comment