Monday, February 14, 2011

"झिंग"

कळकट्ट बाहीने त्याने,
कपाळावरचा घाम पुसला,
अन रुपयाच्या नाण्याकडे,
पहात ओशाळवाणं हसला......

साला,काय जिंदगानी हाये,
ह्या परीस जनावर बरं,म्हणत,
फलाटावरच्या एका कोपर्‍यात,
काळा तंबाखु मळीत बसला........

रात्रीची शेवटाली ट्रेन,
गेली होती निघुन,
दोन चार पॅसेंजर बी,
रेंगाळुन गेले होते घरला.....

दाढीचं खुंटं खाजवित,
तंबाखुची पिचकारी मारीत,
अण्णाच्या गुत्त्यावर जाउन,
एक नवटाक दे म्हणुन खेकसला.....

घरला सोन्यावाणी बायको हाये,
ल्हानगं शेंबडं पॉर हाये,
समदं,दारु मध्ये इसरला,अन,
झोपड्यात डुकरावाणी पसरला.....

घरची लक्षुमी कसाबसा,
आपला संसार रेटीत व्हती,
पोराच्या तोंडात दुध म्हणुन,
पिठाचं पानी चाटीत व्हती,
असा एकच नाही,त्या वस्तीतला,
प्रत्येक संसार देशोधडीस लागला......

दारुच्या व्यसनापायी झिंगुन,
कैक हात निरुपयोगी झाले,
जे व्यसनात गुरफटले ते,
पार मातीत मिसळुन गेले,
ह्या कष्टकर्‍यांच्या पैशावर,
तो अण्णा मात्र गब्बर झाला......

खरंच पार वाताहात होते राव,
ह्या व्यसनात होरपळुन उठतो,
रंक आणि राव,
देशोधडीला लागतो सारा गाव,
म्हणुनच म्हणतो गड्यांनो,
ही दारुची "झिंग" बरी न्हाय,
गड्या आपला गाव भला.......

      नंदू

No comments:

Post a Comment