Monday, February 14, 2011

देवा.... सोन्याची जेजुरी...

म्हणं,देवा तुझी सोन्याची जेजुरी,
तु बसलास सोन्याच्या मखरी,
पर गरीबाला झाली दुस्वार,
कांदा अन भाकरी,
अन देवा तुझी सोन्याची जेजुरी...

चाकर मान्यास्नी मिळतो,
महीन्याचा पगार तरी,
आम्हाला महाग झाली,
एका वक्ताची मजुरी,
अन देवा तुझी सोन्याची जेजुरी...

गबर झाले अडत्ये न वेपारी,
लक्षुमी भरी पाणी त्यांचे घरी,
हवालदिल झाला बघा शेतकरी,
अन देवा तुझी सोन्याची जेजुरी....

गुंड झाले बघा इथे पुंड,
ना राहीला त्यास्नी,
कसलाच भयगंड,
त्यांना मिळं हमखास आमदारी,
अन आम्हा इथं फकस्त नादारी,
अन देवा तुझी सोन्याची जेजुरी...

थंडी पडलीय कडाक्याची,
संगत फकस्त शेकोटीची,
हंतरायला ना इथं साधी दरी,
न देवा तुझी सोन्याची जेजुरी...

तुला मिळतुया सोन्याचा हार,
इथं म्हागली भाजी भाकर,
हाता तोंडाची होतीया मारामारी,
न देवा तुझी सोन्याची जेजुरी....

आदर्श घोटाळे भ्रष्ट नेत्यांचे,
गगनाला भिडले भाव कांद्याचे,
मधल्या मध्ये मलिदा खाती,
बघा वरीष्ठ अधिकारी........

न कसं म्हणावं आम्ही,
देवा तुझी सोन्याची जेजुरी.....

         नंदू

No comments:

Post a Comment