Monday, February 14, 2011

एकटं रहावसं वाटतंय....

आज खुप एकटं,
रहावसं वाटतंय,
आयुष्यातील सुटलेल्या क्षणांना,
आज आठवावसं वाटतंय......

आठवण ही पानावरच्या,
दवबिंदु सारखी असते,
क्षणात लख्ख तर,
क्षणात ओघळुन विसरणरी असते...
डोळे बंद करुन पुन्हा,
त्या आठवणींना गोंजारावसं वाटतंय,
आयुष्यातील सुटलेल्या क्षणांना,
आज आठवावसं वाटतंय.....(१)

हळु हळु त्या क्षणांना,
कलत्या वयाचं रुप आलंय,
नकळत का होईना पण,
डोक्यावर पांढर्‍या केसांचं जाळं झालंय...
कधी कधी वाटतं,
काय करु या अनुभवांचं,
खरच,जखम भळभळली,
तर काय होईल या मनाचं,
ऐन वसंतातल्या गार पाउसरुपी क्षणांना,
सोडुन कृत्रिम पावसात,
भिजल्याचं दुखः आज जाणवतंय,
आयुष्यातील सुटलेल्या क्षणांना,
आज आठवावसं वाटतंय........(२)

कलत्या सुर्याकडे पाठ,
करणारे सारेच असतात,
लांब होत जाणार्‍या,
सावल्यां सारखेच ते भासतात,
मनावरचं ओझं आता खुप,
जड झाल्यासारखं वाटतंय,
आयुष्यातील सुटलेल्या क्षणांना,
आज आठवावसं वाटतंय........
म्हणुनच आज फिरुन,
एकटं एकटं रहावसं वाटतंय........(३)

                  नंदू

No comments:

Post a Comment