Friday, March 25, 2011

हे कळतंच नाही नंतर...

प्रेमाच्या एकाच वाटेवर,
चालत होतो आपण,
ठेऊनी जरासे अंतर,
विरघळल्या साई सारखे,
कधी,कसे एकरुप झालो,
हे कळलेच नाही नंतर....

तु ही तीच अन,
मी ही तोच होतो,
पण असे वाटले तेव्हा,
जगण्याचा मार्ग दिसला,
विरहात होरपळल्या नंतर.....

अंतरंगीचे रंग हे जणु,
भासत होते कोरडेच तेव्हा,
पण खरा रंग मनी भरला,
तु ह्रदयी विसावल्या नंतर....

अंधार अंतरी दाटला होता,
प्राणही शुष्क भासत होता,
अंधारलेल्या वाटेवर मला,
हा लोभसवाणा चेहरा दिसला,
अंतरीचा दिवा उजळल्या नंतर.....

ती वाट ही जराशी,
आता संकोचली होती,
तुला काही विचारण्या,
खुप आतुरली होती,
पण भानच ना उरले तेव्हा,
तुझे स्मित झळकल्या नंतर....

आता ती वाट,
फार मळली आहे,
जीवनाच्या रगाड्यात,
रुळली आहे,
आता मात्र ठेवावे,
लागतच नाही अंतर,
तरी सुद्धा कधी,
कसे एकरुप होतो,
हे कळतंच नाही नंतर.......
हे कळतंच नाही नंतर.......












नंदू

माझी मीच....

माहीत आहे मला चांगलं,
तुझं हे वागणं नेहमीचंच आहे,
पण अंतरंगी अगदी अस्वस्थ,
मात्र, माझी मीच आहे......

तुला त्याची पर्वाच नाही,
तुझं हे सतावणं रोजचंच आहे,
पण ह्र्दयी अगदी खिन्न,
मात्र, माझी मीच आहे.....

कधीतरी मला समजुन घेशील,
याच आशेत वावरायचं आहे,
पण निराशेने विछिन्न,
मात्र, माझी मीच आहे.......

चंद्र,चांदण्या,रातराणीचा सुगंध,
हे फक्त आता कल्पनेतच आहे,
पण हे सर्व स्मरताना उद्विग्नं,
मात्र, माझी मीच आहे........

आता फक्त तुझ्याच आठवणींना,
उराशी घेउन कवटाळायचं आहे,
त्या सरत्या आठवणींची साक्षी,
मात्र, माझी मीच आहे.......












नंदू

असे काय घडले....?

माझ्याही नकळत आज,
असे काय घडले,
नाही म्हणताना मन,
हे तुझ्यावरच का जडले.....?

दिली होती ताकीद,
एवढ्याच साठी डोळ्यांना,
तरी वेंधळे नयन माझे,
तुझ्या साठीच का रडले.....?

ठरवले होते असे,
मनाशी माझ्याच कैकदा,
तरी अधीर मन माझे,
तुझ्याच पाशात का जखडले....?

बजावले होते पावलांना,
अडखळु नका कधीही,
तरी अस्थिर पाऊल माझे,
तुझ्याच दारी का धडपडले.....?

फिरुन कधीही पुन्हा,
गहीवरायचे नव्हते मला,
तरीही अनावर असे दोन अश्रु,
तुझ्याच ओंजळीत का सांडले....?

वेदना ह्रदयीची दाखवुच,
द्यायची नव्हती मला,
तरी उरीच्या वेदनेचे शल्य,
तुझ्याच कानी का ओरडले....?

अथक प्रयत्ना नंतर ही,
तुला नकार देववेना,
"नाही"हे शब्द ही माझ्या,
ओठांवरच का अडले......?












नंदू

शाळा

आज फिरुन, पुन्हा एकदा,
शाळेत जावसं वाटतंय,
शाळेतल्या त्या बाकावर,
लहान होऊन बसावसं वाटतंय....

त्या अनोळखी,
चेहर्‍यांचं ओळखीत,
अन पुढे घट्ट मैत्रीत,
झालेलं रुपांतर,
त्या वर्गातल्या,
बैसण्याच्या जागेतलं,
आपसुक कमी,
झालेलं ते अंतर,
लहानपणीची ती गंमत पुन्हा,
अनुभवावी असं वाटतंय,
फिरुन एकदा नव्याने,
बालपण जपावसं वाटतंय......

माध्यमिक शाळेत गेल्यावर,
आलेलं ते जरासं शहाणपण,
त्याच उन्मादात विरुन,
गेलेलं ते लहानपण,
बालपणाचे ते वारु,
चौखुर उधळावं असं वाटतंय,
फिरुन एकदा नव्याने,
मास्तरांच्या छडीशी सलगी,
करावी असं वाटतंय......

गणिताच्या पाढ्यांनी,
उडणारी ती तारांबळ,
ईंग्रजीच्या धड्यांनी नष्ट,
व्हायचं अंगचं बळ,
विज्ञानाची कारणं तर,
द्यावी लागायची बख्खळ,
पुन्हा एकदा,
आईच्या कुशीत शिरुन,
बाराखडी म्हणावसं वाटतंय,
बाबांच्या धाकात राहुन,
त्यांचा ओरडा खावासं वाटतंय.......

ईतिहास आणि भुगोलाचा,
दरारा केवढा मोठा,
हिंदी मराठीच्या मार्कांना,
मात्र नव्हता कधीच तोटा,
नागरीक शास्त्राच्या तासाप्रमाणं,
नागरीक व्हावसं वाटतंय,
पुन्हा एकदा प्रगती पुस्तकातला,
लाल शेरा टाळावसं वाटतंय......

मधल्या सुट्टीत,
आईने दिलेली,
सवंगड्यां सोबत,
खाल्लेली पुरणपोळी,
वर्गात फाऊंटन पेनने खेळलेली,
ती नीळ्या शाईची होळी,
आज मात्र,
बॉल पेन आल्याने,
मन जरा खट्टु होतंय,
पुन्हा एकदा नव्याने,
ती नीळी होळी खेळावसं वाटतंय....

दहावीच्या वर्गातला तो,
शेवटचा समारोप सोहळा,
नाही म्हटलं तरी सरांचाही,
डबडबला होता डोळा,
पुन्हा केव्हा भेटु म्हणुन,
गळाभेट करावसं वाटतंय,
आज पुन्हा एकदा ते,
सारं आठवावंस वाटतंय......

आज फिरुन पुन्हा एकदा,
शाळेत जावसं वाटतंय,
शाळेच्या त्या विशाल प्रांगणात,
लहान होऊन बागडावसं वाटतंय.......











नंदू

नियम

बगळ्याने धरले ध्यान,
माशास न उरले त्राण,
एकाचा होई खेळ,
दुसर्‍याचा जाई प्राण.....

जंगलचे कायदे ही तसेच,
अन त्याचे ही कैक प्रकार,
हरीणाचा जीव येई कंठाशी,
वाघाला मिळते शिकार.....

आकाशीच्या पक्षांची दशाही,
वेगळी अशी नाही काही,
आसुसल्या गिधाडांच्या तोंडी,
चिमण्या पाखरांचा जीव जाई.....

भावनाशुन्य मानवाच्या जगात,
याहुन दुसरे काय घडणार,
धन दांडग्यांच्या होमात,
उपेक्षितांची आहुती पडणार.....

मानव असो वा पशुपक्षी,
सर्वांना लागु नियम एक,
मिळुन रहा रे सार्‍यांनी,
होऊ नये गर्वाचा अतिरेक.....










नंदू

Wednesday, March 16, 2011

मौन










तु किती ही मौन पाळलंस तरी,
तुझ्या डोळ्यांची भाषा कळत होती,
ह्रदयाची स्पंदनं अबोल झाली तरी,
माझ्या ह्रदयात ती घोळत होती.....



तु किती ही मौन पाळलंस तरी,
तुझी नजर खाली वळत होती,
मी नजर द्यायचं म्हटलं तरी,
माझ्या नजरेला नजर द्यायचं टाळत होती.....

तु किती ही मौन पाळलंस तरी,
मला ह्रदयाची भाषा कळत होती,
तुझ्या ह्रदयाची धडधड वाढली तरी,
माझ्या ह्रदयात ती मिसळत होती.....

तु किती ही मौन पाळलंस तरी,
तुझ्या ओठांची भाषा कळत होती,
तु कितीही नाकारायचं म्हटलंस तरी,
दाताखाली ओठ दाबुन कळवळत होती.....

तु किती ही मौन पाळलंस तरी,
तुझी देहबोली स्पष्ट होत होती,
ओठांवर नाही असलं तरी ही,
मान हो म्हणण्यास तळमळत होती.....

प्रेमाच्या नाजुक गणिताला,
मौनाची वजाबाकी छळत होती,
भागायचं नसलं काही ही, तरी,
नजरेची बेरीज गुणल्यानं जुळत होती.....

नंदू

Tuesday, March 15, 2011

सहजच.....

नात्याची वीण,
खुप घट्ट असावी,
त्यात कुठल्याही,
गैरसमजाची,
गाठ सैल नसावी....

सहजच.....

अंधारातल्या सावल्या,
माझ्या पासुन दूर झाल्या,
उजेडात येताच मात्र बघा,
माझ्यात विरघळुन गेल्या....

सहजच.....

आठवणीत यायचंच होतं,
तर का गेलीस सोडुन,
जन्म जन्मांतरीचे,
आपले ऋणानुबंध तोडुन......

सहजच.....

तुझ्या डोळ्यांतले ते आर्त भाव,
मला कधी कळलेच नाहीत,
म्हणुनच कदाचित आपले सूर,
आयुष्यात कधी जुळलेच नाहीत.....

सहजच.....

तहानलेल्या जीवाला,
एक थेंब पाण्याची आस आहे,
अन क्षणभंगुर जीवनाला,
पुरेसा एक श्वास आहे........

सहजच.....

तुझं माझ्याकडे ते एकटक पहाणं,
नाजुक जीवणी दाताखाली दाबुन,
पायाच्या अंगठ्यानं मातीत रेघाटणं,
सारंच कसं जीवघेणं होतं....
बेधुंद करी मज डोळ्यातील भाष्य,
अन तुझं मधाळ मादक हास्य,
सारंच माझ्या जीवावर बेतनं होतं.......
....नंदू....

सहजच.....

प्रेम कुणावरही जडणं,
हा काही गुन्हा नाही,
अन ते एकदाच जडतं,
पुन्हा पुन्हा नाही.......

टाहो

चबुतर्‍या वरच्या त्या,
स्वातंत्र्य सैनिकाचा,
आत्मा कसा हळहळला,
जीर्ण झालेल्या डोळ्यांतुन,
एक जर्जर अश्रु घरंगळला....

म्हणाला, याच साठी,
केला होता का अट्टाहास..?
ईंग्रजांच्या तोंडचा,
पळवला होता घास,
त्राही त्राही म्हणुन कळवळला,
जीर्ण झालेल्या डोळ्यांतुन,
शिणलेला अश्रु ओघळला.....

उदासीन सरकार अन,
भयभीत हतबल जनता,
कुणीच न कुणाला,
वाली उरला आता,
जखम उरीची घेउन तळमळला,
जीर्ण झालेल्या डोळ्यांतुन,
एक हतबल अश्रु गळला.....

चोहिकडे माजलीय बजबजपुरी,
घोटाळ्यांनी बेजार सानथोर सारी,
नखशिखांत पहा शहारला,
जीर्ण झालेल्या डोळ्यांतुन,
शहारुन अश्रु पाझरला......

कर्जाने बेहाल होऊन,
भुमीपुत्र करी आत्महत्या,
जन्मण्या आधीच कळ्यांची,
केली जाई राजरोस हत्या,
काळजीने जीव त्याचा पाघळला,
जीर्ण झालेल्या डोळ्यांतुन,
ओशाळवाणा अश्रु रेंगाळला.....

आताशा चबुतर्‍यावर,
पक्षांचीच लागते रीघ,
वर्षातुन एकदा पक्षातर्फे,
हारांचा पडतो ढीग,
थोडासा गहिवरुन मावळला,
जीर्ण झालेल्या डोळ्यांतुन,
एक झाकोळलेला अश्रु,
मातीत मिसळला....

स्वातंत्र्य वीरांचा यांना,
विसर पडला भारी,
परके जाहलो आता,
आपुल्याच घरी,
टाहो फोडुन हंबरला,
जीर्ण झालेल्या डोळ्यांतुन,
एक सुरकुतलेला,
अश्रु निखळला.......

नंदू

का....?

यायचंच होतं आठवणींत,
तर,का गेलीस अशी सोडून,
जन्म जन्मांतरीचे आपले,
ऋणानुबंध तोडुन......?

प्रेम आपले जगावेगळे,
ते साकारण्याचे ढंग आगळे,
रुसलीस कधी तु तर,
मी उभा कान पकडून,
रुसलो कधी मी तर,
तु उभी हात जोडून,
का गेलीस असं,
ह्रदयाचं नातं तोडून....?

आवडायचं तुला,
सागराची मधुर गाज ऐकायला,
एकमेकांचे हात हाती गुंफायला,
दोघंच बसायचो आपण,
पाण्यात पाय सोडून,
मग का गेलीस तु अशी,
त्या सागराच्या कुशीत बुडून.....?

आवडायचं तुला,
चांदण्यात फिरायला,
खांद्यावर माझ्या हनुवटी ठेउन,
कानात हळुच कुजबुजायला,
चंद्र तारकांचा खेळ पहात,
दोघंही पुरते जायचो गढून,
मग का गेलीस अशी,
चांदण्यांशी खेळायला,
चंद्राशी नातं जोडून........?

आवडायचं तुला,
रात्रीच्या वेळी अंगणात,
लाजुन प्राजक्तामागे लपायला,
रातराणीचा मंद सुगंध,
ओंजळीत घेउन हुंगायला,
प्रेमालाप करायचीस दोन्ही,
हात माझ्या गळ्यात वेढून,
मग का गेलीस अशी,
सर्व प्रेमपाश एका झटक्यात तोडून......?

आता फक्त एकटाच असतो,
खिडकीकडे डोळे लावुन,
पहात असतो तुझी चाहुल,
लागते का.?सारखं दाराकडे जाउन,
तुझ्या आठवणी आल्या की,
आताशा डोळ्यांनीही दिलंय,
पाझरायचं सोडून,
का गेलीस असा,
भातुकलीचा डाव अर्ध्यावर मोडून..???

नंदू

मात्र.....मी उभा आहे

मला माझ्याच मंदिरी प्रवेश नाही,
इथे मदांधांचा दबदबा आहे.....
दुबळे मागती हात मदतीचा....मात्र,
कर कटीवर घेउनी मी उभा आहे....

चोरट्यांना इथे खास प्रवेशिका,
सामान्यांना रांगेतुन मुभा आहे.....
घाम गाळती दर्शन घेण्या माझे....मात्र,
कर कटीवर घेउनी मी उभा आहे....

बडव्या पुजार्‍यांनी मांडलीय शोभा माझी,
रात्रीस सर्वांची बेधुंद मयसभा आहे....
गर्दी झालेली नवस मागण्यासाठी....मात्र,
कर कटीवर घेउनी मी उभा आहे.....

षंढांच्या राज्यात पुंडांची चलती,
दीनाच्या घरी,
हाता तोंडाची शोकसभा आहे....
लावुनी डोळे माझ्या आगमनासी....मात्र,
कर कटीवर घेउनी मी उभा आहे.....

वारीच्या दारी वारकर्‍याची दैना भारी,
पैसे वाल्यांचा सवता सुभा आहे,
डोळ्यांत प्राण आणुनी करीती वारी माझी....मात्र,
कर कटीवर घेउनी मी उभा आहे.....

अठ्ठावीस युगे एकाच वीटेवर,
न चुकता मी रात्रंदिन उभा आहे,
मदतीला जाईनही हो भक्तांच्या....मात्र,
इथे सत्तांधांचा दबदबा आहे.....












नंदू

Thursday, March 10, 2011

माझी "सावली"...

ती सतत माझ्या भोवती,
फिरत असते सावली सारखी,
वीस वर्षांपुर्वी आली ती,
होऊनी तिच्या मायेला पारखी.......

तिनं तर केलंय माझ्या,
आयुष्याला केव्हाच आपलसं,
माझं जीवनही झालंय सूरमयी,
जे वाटत होतं थोडं रुक्ष असं......

वेलीवरती फुले फुलली,
दोन गोंडस छान,
मातृत्वा संगे दिला तिने,
मला पितृत्वाचा मान......

वीस वर्षांपासुनची ती सावली,
आहे मोठी समंजस,
घरी आल्या गेल्याची,
करते मस्त छान उठाबस......

सुख दुखःत माझ्या मला,
साथ दिलीय त्या सावलीने,
पडते पणाच्या काळात माझ्या,
आधार दिलाय त्या माउलीने.....

कुणी म्हणे जीवन संगिनी,
कुणी म्हणे तिला अर्धांगिनी,
नंदकुमार म्हणे तिला,
या दगडाची ती "स्वामिनी"

नंदू
(महिला दिनाच्या निमित्ताने माझ्या "सावली"ला समर्पित....)













गृहीणी

दिवसभर बॉसची बोलणी,
शॉर्टनोट्सची पॅड न लेखणी,
निमुटपणे सहन करत बिचारी,
संध्याकाळची वाट पहात,
घाव मनीचे झेलते ती गृहीणी.....

पहाटेच लगबगीनं ते डबा करणं,
सकाळीच स्टेशनवरच्या गर्दीतुन,
वाट काढत ८.३५ची लोकल पकडणं,
निमुट सहन करत बिचारी,
लेट मार्कच्या आधी,
ऑफिसला पोहचते ती गृहीणी......

दिवसभर पुरुषांच्या झेलत नजरा,
हसत खेळत कंठते आपला दिवस बरा,
मैत्रीणींचे सोबत अकाउंट्स तपासत,
निमुट सहन करत बिचारी,
संध्याकाळी लोकलच्या गर्दीत,
सावरत बसते ती गृहीणी.....

रात्रीच्या स्वयंपाकाची करत तयारी,
भाजी खरेदी करत बाजारात,
मारते एकटीच फेरी,
घरी सासुची संतापलेली स्वारी,
रुचकर चवीचा करुनी खाना भारी,
निमुट सहन करत बिचारी,
उद्याचा विचारात गढुन जात,
झोपेच्या आधिन होते ती गृहीणी.......

नंदू

Sunday, March 6, 2011

एक नटखट कविता

तो म्हणाला,
थोडा वेळ अशीच,
बसुन रहा....
ती म्हणाली,
तुही माझ्या डोळ्यांत,
थोडे हसुन पहा....

तो म्हणाला,
मला तुझ्या डोळ्यांत,
चंद्र दिसतोय.....
ती म्हणाली,
तो तुला पाहुन,
थोडा लाजतोय.....

तो म्हणाला,
छट्ट... तो तुझ्या,
चेहर्‍याला भुललाय....
ती म्हणाली,
तेव्हाच तो माझ्या,
चेहर्‍याकडे कललाय....

तो म्हणाला,
तुझं आपलं बरंय,
चंद्र्सुद्धा तुझ्यावर,
प्रेम करतोय.....
ती म्हणाली,
चल चावट कुठला,
तो तर चांदणीच्या,
मागे पळतोय.....

तो म्हणाला,
ए,अशी जवळ,
ये ना.....
ती म्हणाली,
नको,कुणीतरी,
पाहील ना.....

तो म्हणाला,
अगं इथं आता,
कोण आपल्याला,
पहायला आलंय....
ती म्हणाली,
राजा,त्या सागराच्या,
मनात बघ कसं,
वादळ सुरु झालंय......

तो म्हणाला,
हा वारा बघ,
तुझ्या केसांत,
भुरभुर फिरतोय....
ती म्हणाली,
त्याच्या स्पर्शाने,
माझा जीव,
कसा हुरहुरतोय.....

तो म्हणाला,
ही वाळु तुझ्या,
उघड्या पायांना,
किस्स करतेय....
ती म्हणाली,
ती आपल्या,
लाडक्या सागराला,
मिस्स करतेय......

तो म्हणाला,
चल वेळ झाला,
आता निघु या....
ती म्हणाली,
थोडा वेळ,
सागर लाटांचा,
खेळ बघु या....

तीनं त्याच्या कडे,
लाजुन पहात म्हटलं,
ए,थोडा वेळ असाच,
बसुन रहा.....
त्यानंही तीला,
जवळ ओढत म्हटलं,
राणी..... तुही,
माझ्या डोळ्यांत,
थोडं हसुन पहा.....

नंदू

ओळखीचा कट्टा

पहा सांज रात झाली,
रोजची दिवाबत्ती ही झाली,
हलकेच सखयाची शीळ,
कानी घुमु लागली......

मनीची धडधड वाढली,
नजर भिरभिरु लागली,
डोळ्यांच्या कोनांतुन,
माजघरातल्या आईचा,
कानोसा घेऊ लागली....

पर्स गळा अडकवली,
वहाण पायी चढविली,
वर्तमानपत्रात घुसलेल्या,
बाबांना चुकवत अलगद,
उंबरा ओलांडती झाली....

वाट रोजचीच होती मळलेली,
ह्रदयी भावनांची गर्दी उसळलेली,
त्याचे पाच मिस्स कॉल पाहुन,
S M S ने उत्तर देती झाली.......

पार्कातल्या कट्ट्यावर त्याला,
हुश्श्श्श.....ती भेटली एकदाची,
त्यालाही भिती होती वाटत,
पार्कात वॉकला येणार्‍या बाबांची,
तिथलाच एकांती बघुन कोपरा,
दोघंही निवांत हो बैसली........

दोघांची नजरा नजर झाली,
त्याने तीच्या बोटांत बोटे गुंफीली,
पाच मिनिटांची ती धावती भेट,
लाख मोलाची किंमती झाली,
उद्या पुन्हा भेटण्याची ग्वाही देउन,
ती घराकडे लगबग चालु लागली.....
ती घराकडे लगबग चालु लागली.....










नंदू

Tuesday, March 1, 2011

"अ-माणुसकी"

नात्यातला जिव्हाळा,
जेव्हा अगदीच न उरतो,
माणुसकीचा लवलेशही,
कसा तेव्हाच सरतो......

माणुसकीने वंचित,
असे बाबा अन आई,
अडगळीत जाऊन पडले,
पहा कित्येक काही......

अपत्याला मोठे करण्या,
सर्वस्व बहाल केले ही,
पण त्याच बछड्याला,
आता माणुसकी उरली नाही.....

दोन जीवांचं मनोमिलन,
जेव्हा शारीरीक नात्यात होई,
अमानुष पणे गर्भ पाडुनी,
त्याची आई जाऊ पाही....

असेच कैक गर्भ पहा,
रस्त्या रस्त्यावर फुलती,
माणुसकीचा एक हात ही,
न येई त्यांचे पुढती.......

आज प्रत्येक जीव पहा,
कसा स्वार्थी होऊ पाही,
जिव्हाळ्याचे नाते विरले,
माणुसकीचा लवलेशही नाही.....
माणुसकीचा लवलेशही नाही.....









नंदू

"अ"मराठी

लाभले आम्हास भाग्य,
म्हणुन बोलतो मराठी,
पैशांच्या राशीत,
मात्र लोळतो "अ"मराठी....

नोकरी साठी टाचा,
घासुन झिजतो मराठी,
तीच नोकरी सहजगत्या,
मिळवतो "अ"मराठी....

बेकारीने गांजुन रोज,
रात्रीचा झिंगतो मराठी,
त्याच दारुच्या पैशावरती,
ग"बार" होतो "अ"मराठी....

आठ बाय दहाच्या खोलीत,
आयुष्य कंठतो मराठी,
परप्रांतातुन येऊन म्हाडाचे,
फ्लॅट्स बळकावतो "अ"मराठी....

राजकीय आखाड्याच्या,
भाऊबंदकीत रमतो मराठी,
त्याच "राज"कारणाचा गैर,
फायदा उठवतो "अ"मराठी....

असंख्य सोशीतांना जरी,
पोसते अमुची मराठी,
परी महाराष्ट्राला गत वैभव,
लाभण्यासाठी धडपडते मराठी.....










नंदू

"हिरवे रान"

हिरवे हिरवे गर्द,
गर्द हिरवे रान,
पाहुनी तो देखावा,
मन माझे,
मोहरुन जाई छान.....

हिरव्या गर्द रानात,
रंगीन पक्षांचे थवे,
मन माझे त्यांच्यासवे,
पंख लावुनी धावे.......

हिरव्या गर्द रानात,
हिरवी हिरवी झाडी,
मन माझे करी,करु,
त्यांची मस्ती थोडी......

हिरव्या गर्द रानात,
धावे खळाळती नदी,
तिच्या सोबत बागडण्या,
झुके झाडाची हरेक फांदी.......

हिरव्या गर्द रानात,
मोठ मोठाली झाडे,
बुंधा त्यांचा पाहुनी,
ह्रदय कसे धडधडे.......

हिरव्या गर्द रानातील,
ती रानफुले पाहुनी,
मन माझे गाई गाणी,
प्रसन्न चित्त होऊनी......

त्या हिरव्या रानातुन,
जाई एक पाउल वाट,
त्या मळलेल्या वाटेवरुनी,
मनी आठवणी येती दाट......

आज राहुन राहुन वाटे,
आताशा ती हिरवी राने,
राहीली कोठे......?
आपणच तर केलेय तिथे,
सिमेंटचे जंगल मोठे........








 नंदू