Sunday, July 31, 2011

मला आठवतंय.....

मला आठवतंय.....
आईने बोट धरुन,
मला पहिल्यांदा उठवलेलं,
त्या एका बोटात आयुष्य भराचं,
प्रेम साठवलेलं....

मला आठवतंय.....
बाबांचा हात पकडुन टाकलेलं,
ते शाळेतलं पहिलं पाऊल,
तिथेच उत्तम संस्कारांची,
लागलेली अनाहुत चाहुल....

मला आठवतोय.....
शाळेतला तो दिवस पहिला,
अवती भवती मुसमुसणार्‍या,
चेहर्‍यांमुळे चांगलाच लक्षात राहिला....

मला आठवतोय.....
दहावीचा पहिला वहिला निकाल,
धडधडणार्‍या ह्रदयानेच,
उजाडलेली ती सकाळ....

मला आठवतोय.....
तो पहिला दिवस कॉलेजचा,
आजुबाजुला दिसलेल्या,
सुंदर चेहर्‍यांमुळे,
नव्यानेच कळलेल्या नॉलेजचा....

मला आठवतंय....
माझं पहिलं वहिलं,
एकुलतं एक प्रेम,
अगदी तुमच्या सारखंच,
माझं ही होतं डीट्टो सेम....

मला आठवतोय.....
तो पहिलाच दिवस पोलीस ट्रेनिंगचा,
पिटी चुकल्यामुळे शिक्षा म्हणून,
पिटीच्या मास्तरांकडुन मिळालेल्या,
फ्रंटरोल आणि क्राऊलिंगचा....

मला आठवतोय.....
माझा पहिलाच पगार पाहिलेला,
धावत घरी जाऊन,
आईच्या चरणी वाहिलेला....

मला आठवतंय.....
मी फर्स्ट युनिफॉर्म घातलेला,
माझ्याही नकळत बाबांनी,
मला सलाम ठोकलेला....

मला आठवतेय.....
लग्नानंतरची ती पहिली,
वहिली मधुचंद्राची रात्र,
फुलांनी सजवलेला पलंग अन,
केशरी दुधाचा ग्लास नसतानाही
मोहरली होती माझी गात्र न गात्र....

मला आठवतंय.....
माझी पहिली मुलगी जन्मली जेव्हा,
बाबा होण्याची जबाबदारी जाणवली,
होती पहिल्यांदा तेव्हा....

मला आता आठवतंय.....
असंच आपलं बरंच काही बाही,
पण पहिल्या वहिल्याला मात्र,
जगात कुठली तोडच नाही.......

नंदू

No comments:

Post a Comment