Wednesday, July 27, 2011

मी हा उभा असा....

रोज फिरुन नवे स्वप्नं,
रोज फिरुन नवा दिलासा,
अनोळख्या वळण वाटेवर,
तुझी वाट पहाण्या,
मी हा उभा असा....

रोज फिरुन नवी चाहुल,
रोज फिरुन नवा कानोसा,
पैंजणांची रुणझुण ऐकण्या,
खिडकीत अधीर,
मी हा उभा असा....

रोज फिरुन नवी उभारी,
रोज फिरुन नवा कवडसा,
धुरकटलेली छबी न्याहाळत,
मी हा उभा असा....

रोज फिरुन नवी प्रतिक्षा,
रोज फिरुन उमाळा जरासा,
ओंजळीतले अश्रु लपवित,
मी हा उभा असा....

रोज फिरुन नवा गंध,
रोज फिरुन नवा आडोसा,
मोगर्‍याच्या दरवळात कोमेजलेला,
मी हा उभा असा....

रोज फिरुन नवा किनारा,
रोज फिरुन वाळुचा स्पर्श नवासा,
सागर लाटांचा मेळ पहात,
मी हा उभा असा....

रोज फिरुन नवा श्वास,
रोज फिरुन सहवास हवासा,
तुझ्या विस्कटलेल्या,
बटांमध्ये तुला शोधीत,
मी हा उभा असा....

आता फिरुन कधी स्वप्नं नाही,
आता फक्त एक दिर्घ उसासा,
तुझ्या आठवणींना उराशी कवटाळीत,
मी हा उभा असा....
मी हा उभा असा....

नंदू

No comments:

Post a Comment