Sunday, July 31, 2011

ओली बट...

ओली बट तुझ्या डोळ्यावर,
रुळु पहात होती,
ओली बट तुझ्या नजरेशी,
खेळु पहात होती,
तुझ्या नजरेची नशा,
काही औरच आहे बाई,
ओल्या बटेतील थेंबांची रांग,
तुझ्या मादक नजरेत,
विरघळु पहात होती....

ओली बट तुझ्यासाठी,
झुरु पहात होती,
ओली बट तुझ्या ह्रदयी,
अलगद शिरु पहात होती,
तुझ्या ह्रदयाची बात,
काही खासच असते बाई,
ओली बट तुला आपलं,
ह्रदय हरु पहात होती....

ओली बट तुला कवेत,
कवटाळु पहात होती,
ओली बट तुझ्यावर,
जीव ओवाळु पहात होती,
तुझ्या अदांची जादु,
काही न्यारीच असते बाई,
ओली बट तुझ्या ह्रदयापाशी,
रेंगाळु पहात होती....

ओली बट आताशा तुझ्या,
गालाशी लगट करु पहातेय,
का असं करुन ती आपल्या,
भावना प्रगट करु पहातेय,
काही कळेना झालंय तिला,
पण ह्रदया पर्यंतची ओली वाट,
मात्र बिकट करुन जातेय....
नंदू

No comments:

Post a Comment