Wednesday, July 27, 2011

ती कविता माझी झाली...

मी सरळ मार्गाने जात होतो,
तिच आडवळणाने आली,
शब्द शब्द ऐसे स्फुरले की,
ती कविता माझी झाली....

वेड्या शब्दांनी वाक्य घडवलं,
मनातलं माझ्या कवन स्फुरलं,
व्यथा अंतरीची कागदी उतरली,
माझ्याही नकळत कशी कोण जाणे,
ती कविता माझी झाली....

रक्तबंबाळ ह्रदय झाले होते,
ह्रदयात टोचले वेदनांचे भाले होते,
त्या कलमालाही वेगळीच धार आली,
मला न जुमानता,
ती कविता माझी झाली....

मित्र मैत्रीणींच्या कौतुकास पात्र,
शब्द ही होते माझे जोडीदार मात्र,
काहींना त्यावर टिकेची घाई झाली,
पण का कुणास ठाऊक,
ती कविता माझी झाली....

आताशा मलाही करमत नाही,
तिच्या वाचुन काही सुचत नाही,
अन सुचलं तरी,
शब्दांनाच झालेली असते घाई,
पहा एकेक चारोळी ही,
अशी काही सुसाटत गेली,
की क्षणभराची माझी कल्पना,
माझ्या आयुष्यभराची,
सखी होऊन गेली....

डोक्याच्या आडवळणाने आलेली ती,
ह्रदयाच्या सरळमार्गावर कधी आली,
कळलेच नाही माझे मला कधी,
पण एक मात्र खरं मित्र हो,
ती कविता माझी झाली....
नंदू

No comments:

Post a Comment