Thursday, July 28, 2011

ती सहनायिका...

नायकाला जेव्हा,
नायिका मिळाली,
ती मात्र तेव्हा,
सहनायिकाच राहीली,
कथा कादंबर्‍यांत
रमणार्‍यांनी मात्र,
तिची ती विरह कथा,
कधी नाही पाहीली....

देव जेव्हा पारोच्या वियोगात,
त्या मदिरेचा दास झाला,
चंद्रमुखीच्या उत्कट प्रेमाचा,
तेव्हाच बघा र्‍हास झाला......

पारो जेव्हा देवच्या प्रेमाची,
होती दासी बनुन राहीली,
तिकडे चंद्रमुखी मात्र त्या,
प्रेमापासुन सदा वंचितच राहीली....

ललीता जेव्हा शेखरच्या ह्रदयी,
परिनीता होऊन बसली,
तेव्हाच गायत्रीच्या ह्रदयात,
उपेक्षित प्रेमाची कळ घुसली....

शेखर ललीताचे अखेरीस,
जेव्हा मनोमिलन झाले,
गायत्रीच्या भाळी तेव्हा,
प्रितीचे उपेक्षित अश्रु आले....

पुराणात जरी आपण,
थोडं डोकावुन पाहीलं,
तिथेही तिने नायिकेच्या,
ओंजळीत त्यागाचं फुल वाहीलं....

जानकीच्या नशीबी रामासह,
तो शापित वनवास आला,
तिथे मात्र उर्मिलेने चौदा वर्षं,
एकांत वास भोगला.....

लक्ष्मणाची तिला कधी,
आठवण नसेल का आली,
पण रामायणात ही पहा,
ती सहनायिकाच झाली....

राधा श्रीकृष्णाची बनली सखी,
तर सुभद्रेच्या नशीबी,
कृष्णाचा पावा आला,
पण कृष्णाच्या भक्तित रमलेल्या,
मीरेने प्यायला हसत विषाचा प्याला....

चित्रपटांतली नायिका जेव्हा,
नायकाच्या मनी हिंदकळते,
सहनायिकेचं प्राक्तन मात्र,
अंधार्‍या दरीत ठेचकाळते....

हे असंच उपेक्षित जीणं,
ती सहनायिका जगली,
कथा कादंबर्‍यातुन रमणार्‍यांनी,
तिची आंतरीक व्यथा,
कधी नाही जाणली.......

हा असाच विरक्त भोग,
त्या तिसर्‍या पात्राच्या,
नशीबी येतो....
कथेतला तो तिसरा कोन,
नेहमीच उपेक्षिला राहातो....


नंदू

No comments:

Post a Comment