Tuesday, March 15, 2011

मात्र.....मी उभा आहे

मला माझ्याच मंदिरी प्रवेश नाही,
इथे मदांधांचा दबदबा आहे.....
दुबळे मागती हात मदतीचा....मात्र,
कर कटीवर घेउनी मी उभा आहे....

चोरट्यांना इथे खास प्रवेशिका,
सामान्यांना रांगेतुन मुभा आहे.....
घाम गाळती दर्शन घेण्या माझे....मात्र,
कर कटीवर घेउनी मी उभा आहे....

बडव्या पुजार्‍यांनी मांडलीय शोभा माझी,
रात्रीस सर्वांची बेधुंद मयसभा आहे....
गर्दी झालेली नवस मागण्यासाठी....मात्र,
कर कटीवर घेउनी मी उभा आहे.....

षंढांच्या राज्यात पुंडांची चलती,
दीनाच्या घरी,
हाता तोंडाची शोकसभा आहे....
लावुनी डोळे माझ्या आगमनासी....मात्र,
कर कटीवर घेउनी मी उभा आहे.....

वारीच्या दारी वारकर्‍याची दैना भारी,
पैसे वाल्यांचा सवता सुभा आहे,
डोळ्यांत प्राण आणुनी करीती वारी माझी....मात्र,
कर कटीवर घेउनी मी उभा आहे.....

अठ्ठावीस युगे एकाच वीटेवर,
न चुकता मी रात्रंदिन उभा आहे,
मदतीला जाईनही हो भक्तांच्या....मात्र,
इथे सत्तांधांचा दबदबा आहे.....












नंदू

No comments:

Post a Comment