Tuesday, March 15, 2011

का....?

यायचंच होतं आठवणींत,
तर,का गेलीस अशी सोडून,
जन्म जन्मांतरीचे आपले,
ऋणानुबंध तोडुन......?

प्रेम आपले जगावेगळे,
ते साकारण्याचे ढंग आगळे,
रुसलीस कधी तु तर,
मी उभा कान पकडून,
रुसलो कधी मी तर,
तु उभी हात जोडून,
का गेलीस असं,
ह्रदयाचं नातं तोडून....?

आवडायचं तुला,
सागराची मधुर गाज ऐकायला,
एकमेकांचे हात हाती गुंफायला,
दोघंच बसायचो आपण,
पाण्यात पाय सोडून,
मग का गेलीस तु अशी,
त्या सागराच्या कुशीत बुडून.....?

आवडायचं तुला,
चांदण्यात फिरायला,
खांद्यावर माझ्या हनुवटी ठेउन,
कानात हळुच कुजबुजायला,
चंद्र तारकांचा खेळ पहात,
दोघंही पुरते जायचो गढून,
मग का गेलीस अशी,
चांदण्यांशी खेळायला,
चंद्राशी नातं जोडून........?

आवडायचं तुला,
रात्रीच्या वेळी अंगणात,
लाजुन प्राजक्तामागे लपायला,
रातराणीचा मंद सुगंध,
ओंजळीत घेउन हुंगायला,
प्रेमालाप करायचीस दोन्ही,
हात माझ्या गळ्यात वेढून,
मग का गेलीस अशी,
सर्व प्रेमपाश एका झटक्यात तोडून......?

आता फक्त एकटाच असतो,
खिडकीकडे डोळे लावुन,
पहात असतो तुझी चाहुल,
लागते का.?सारखं दाराकडे जाउन,
तुझ्या आठवणी आल्या की,
आताशा डोळ्यांनीही दिलंय,
पाझरायचं सोडून,
का गेलीस असा,
भातुकलीचा डाव अर्ध्यावर मोडून..???

नंदू

No comments:

Post a Comment