Friday, March 25, 2011

शाळा

आज फिरुन, पुन्हा एकदा,
शाळेत जावसं वाटतंय,
शाळेतल्या त्या बाकावर,
लहान होऊन बसावसं वाटतंय....

त्या अनोळखी,
चेहर्‍यांचं ओळखीत,
अन पुढे घट्ट मैत्रीत,
झालेलं रुपांतर,
त्या वर्गातल्या,
बैसण्याच्या जागेतलं,
आपसुक कमी,
झालेलं ते अंतर,
लहानपणीची ती गंमत पुन्हा,
अनुभवावी असं वाटतंय,
फिरुन एकदा नव्याने,
बालपण जपावसं वाटतंय......

माध्यमिक शाळेत गेल्यावर,
आलेलं ते जरासं शहाणपण,
त्याच उन्मादात विरुन,
गेलेलं ते लहानपण,
बालपणाचे ते वारु,
चौखुर उधळावं असं वाटतंय,
फिरुन एकदा नव्याने,
मास्तरांच्या छडीशी सलगी,
करावी असं वाटतंय......

गणिताच्या पाढ्यांनी,
उडणारी ती तारांबळ,
ईंग्रजीच्या धड्यांनी नष्ट,
व्हायचं अंगचं बळ,
विज्ञानाची कारणं तर,
द्यावी लागायची बख्खळ,
पुन्हा एकदा,
आईच्या कुशीत शिरुन,
बाराखडी म्हणावसं वाटतंय,
बाबांच्या धाकात राहुन,
त्यांचा ओरडा खावासं वाटतंय.......

ईतिहास आणि भुगोलाचा,
दरारा केवढा मोठा,
हिंदी मराठीच्या मार्कांना,
मात्र नव्हता कधीच तोटा,
नागरीक शास्त्राच्या तासाप्रमाणं,
नागरीक व्हावसं वाटतंय,
पुन्हा एकदा प्रगती पुस्तकातला,
लाल शेरा टाळावसं वाटतंय......

मधल्या सुट्टीत,
आईने दिलेली,
सवंगड्यां सोबत,
खाल्लेली पुरणपोळी,
वर्गात फाऊंटन पेनने खेळलेली,
ती नीळ्या शाईची होळी,
आज मात्र,
बॉल पेन आल्याने,
मन जरा खट्टु होतंय,
पुन्हा एकदा नव्याने,
ती नीळी होळी खेळावसं वाटतंय....

दहावीच्या वर्गातला तो,
शेवटचा समारोप सोहळा,
नाही म्हटलं तरी सरांचाही,
डबडबला होता डोळा,
पुन्हा केव्हा भेटु म्हणुन,
गळाभेट करावसं वाटतंय,
आज पुन्हा एकदा ते,
सारं आठवावंस वाटतंय......

आज फिरुन पुन्हा एकदा,
शाळेत जावसं वाटतंय,
शाळेच्या त्या विशाल प्रांगणात,
लहान होऊन बागडावसं वाटतंय.......नंदू

No comments:

Post a Comment