Tuesday, March 15, 2011

टाहो

चबुतर्‍या वरच्या त्या,
स्वातंत्र्य सैनिकाचा,
आत्मा कसा हळहळला,
जीर्ण झालेल्या डोळ्यांतुन,
एक जर्जर अश्रु घरंगळला....

म्हणाला, याच साठी,
केला होता का अट्टाहास..?
ईंग्रजांच्या तोंडचा,
पळवला होता घास,
त्राही त्राही म्हणुन कळवळला,
जीर्ण झालेल्या डोळ्यांतुन,
शिणलेला अश्रु ओघळला.....

उदासीन सरकार अन,
भयभीत हतबल जनता,
कुणीच न कुणाला,
वाली उरला आता,
जखम उरीची घेउन तळमळला,
जीर्ण झालेल्या डोळ्यांतुन,
एक हतबल अश्रु गळला.....

चोहिकडे माजलीय बजबजपुरी,
घोटाळ्यांनी बेजार सानथोर सारी,
नखशिखांत पहा शहारला,
जीर्ण झालेल्या डोळ्यांतुन,
शहारुन अश्रु पाझरला......

कर्जाने बेहाल होऊन,
भुमीपुत्र करी आत्महत्या,
जन्मण्या आधीच कळ्यांची,
केली जाई राजरोस हत्या,
काळजीने जीव त्याचा पाघळला,
जीर्ण झालेल्या डोळ्यांतुन,
ओशाळवाणा अश्रु रेंगाळला.....

आताशा चबुतर्‍यावर,
पक्षांचीच लागते रीघ,
वर्षातुन एकदा पक्षातर्फे,
हारांचा पडतो ढीग,
थोडासा गहिवरुन मावळला,
जीर्ण झालेल्या डोळ्यांतुन,
एक झाकोळलेला अश्रु,
मातीत मिसळला....

स्वातंत्र्य वीरांचा यांना,
विसर पडला भारी,
परके जाहलो आता,
आपुल्याच घरी,
टाहो फोडुन हंबरला,
जीर्ण झालेल्या डोळ्यांतुन,
एक सुरकुतलेला,
अश्रु निखळला.......

नंदू

No comments:

Post a Comment