Tuesday, August 2, 2011

दिवस मोजायचं सोडलंय...

बर्‍याच दिवसां पासुन मी,
दिवस मोजायचंच सोडलंय,
रात्रीच्या दिवा स्वप्नांना,
दिवसाच्या उजेडा पासुन तोडलंय....

अविरत राबणार्‍या,
हातांचा दोष काय हो..?
पण आता त्याच हातांनी,
कष्ट करायचंच सोडलंय,
कारण आजकाल नशिबानं,
जणू कष्टाशी नातंच तोडलंय....

आतुर वाट पहाणार्‍या,
डोळ्यांचा दोष काय हो..?
पण आता त्यांनी ही,
घड्याळाकडे बघायचंच सोडलंय,
कारण आजकाल घड्याळानंही,
जणू काट्यांशी नातंच तोडलंय....

निष्पाप जीवन जगणार्‍या,
जीवांचा दोष काय हो..?
पण आताशा त्यांनी ही,
मोकळा श्वास घेणंच सोडलंय,
कारण आजकाल श्वासांनीही,
जणू आत्म्याशी नातंच तोडलंय....

हो.....,बर्‍याच दिवसां पासुन,
मी ही दिवस मोजायचं सोडलंय,
स्वप्न भासणार्‍या आठवणींना,
भयान वास्तवा पासुन तोडलंय....
नंदू

No comments:

Post a Comment