Thursday, August 18, 2011

"तु"...

तलावाकाठी,
त्या रंकाळ्याच्या,
पायथ्यापाशी,
त्या पन्हाळ्याच्या,
आठवतंय का,
झुलवत होतो,
दोर्‍या आपण,
त्या पारंब्यांनी,
बांधलेल्या झोपाळ्याच्या....

अर्ध्या चड्डीतला,
मी बावळट गबाळा,
चढुन जायचो बघ,
झरझर पन्हाळा,
तुला भापवण्यासाठीच,
मी घ्यायचो तो अवतार,
पण खाली उतरे पर्यंत,
गळालेलं असायचं,
अवसान पार....

परकर पोलक्य़ातलं,
तुझं ते अजब ध्यान,
दोन वेण्यांमधला गजरा,
मात्र दिसायचा खुप छान,
सागरगोट्या खेळताना,
तुझं ते माझ्याकडे पहाणं,
मी मात्र पाहीलं की,
लाजत लाजत,
जमिनीवर पायाच्या,
अंगठ्याने रेघोट्या काढणं....

नाही म्हटलं तरी,
मला ते समजलं होतं,
ह्रदयीच्या स्पंदनातुन,
बरचसं उमजलं होतं,
अबोल जरी असले,
ओठ तुझे तरी,
डोळ्यांतुन तुझ्या मला,
ते बरोबर गवसलं होतं....

आज राहुन राहुन,
मला ते आठवतंय,
गतस्वप्नांना ह्रदयात,
हलकेच साठवतंय,
मनात साचलेल्या,
आठवांच्या जळमटांना,
ओघळणार्‍या आसवांनी,
अलगद हटवतंय....

आज तो रंकाळा ही,
तसाच आहे,
तो पन्हाळाही,
तसाच आहे,
त्या खेळातली,
"तु" मात्र नाहीस,
सुर पारब्यांनी,
सजवलेला झोपाळा ही,
तसाच आहे....
नंदू

No comments:

Post a Comment