Saturday, August 27, 2011

वेड व आकर्षण...

तुला वेड चंद्राचं,
अन मला चांदण्यांचं...
तुला आकर्षण सुर्याचं,
अन मला किरणांचं...

तुला वेड,
चमकणार्‍या सौदामिनीचं,
अन मला,
कोसळणार्‍या जलधारांचं...
तुला आकर्षण,
बरसणार्‍या टपोर्‍या थेंबांचं,
अन मला,
टप टप पडणार्‍या गारांचं...

तुला वेड,
पहाटेच्या दवबिंदुंचं,
अन मला,
ते झेलणार्‍या तृणपातीचं...
तुला आकर्षण,
सोनसळी पहाटेचं,
अन मला,
चंदेरी रातीचं...

तुला वेड,
शांत दिसणार्‍या सागराचं,
अन मला,
खळाळणार्‍या लाटांचं...
तुला आकर्षण,
मळलेल्या पाऊलवाटेचं,
अन मला,
नव नव्या वळण वाटांचं...

तुला वेड,
फुलांनी बहरलेल्या प्राजक्ताचं,
अन मला,
प्राजक्ताच्या दरवळीचं...
तुला आकर्षण,
बेधुंद निसर्गाचं,
अन मला,
त्याने ल्यालेल्या हिरवळीचं...

तुला वेड,
रंगीबेरंगी फुलांचं,
अन मला,
त्या फुलांच्या गंधाचं...
तुला आकर्षण,
नात्यातल्या रेशीमगाठीचं,
अन मला,
रेशमी नात्यातल्या ऋणानुबंधाचं...

तुला वेड,
सप्तरंगी इंद्रधनुचं,
अन मला,
त्यातल्या विविधरंगी छटांचं...
तुला आकर्षण,
माझ्या भव्य कपाळाचं,
अन मला,
तुझ्या वार्‍यासंगे खेळणार्‍या बटांचं...

तुला वेड,
माझ्या निळ्याशार डोळ्यांचं,
अन मला,
तुझ्या गाणार्‍या गोड गळ्याचं...
तुला आकर्षण,
माझ्या भरदार छातीचं,
अन मला,
तुला पडणार्‍या नाजुक खळ्यांचं...

तुला आकर्षण,
माझी आवड आपल्या,
ह्रदयी जोपासण्याचं,
अन मला,
तुझी नावड ही,
आपल्या मनी जपण्याचं...
तुला वेड,
माझी वेड्या सारखी,
वाट पहाण्याचं,
अन मला,
तुझी वाट पहात,
भर उन्हात ही तापण्याचं...

तुझं आकर्षण अन माझ वेड,
एकमेकांना पुरक असंच होतं,
कुणास ठाऊक प्रेमाच्या ह्या खेळात,
सर्वांचं हे अगदी तसंच होतं....???नंदू

No comments:

Post a Comment