Saturday, August 13, 2011

"माय"...

फाटंच्या पारी,
फाटक्या वाकळातुन,
मायची हाक ऐकु आली,
आन तिच्या उबदार,
कुशीची आठव होऊन,
ती वाकळ बी,
जराशी आळसावली....

सुर्यदेवाचे घोडे आजुन,
जमीनीवर आले बी नव्हते,
पर माझ्या मायचे हात,
मातुर यंत्रावानी राबत व्हते....

माय माझी तशी अडानी,
पर ह्या हेवारशुन्य जगानं,
बनवली तिला श्हानी,
चार घरची धुनी भांडी करुन,
बांधली गाठीला तिनं,
चार नाणी....

मायनं कधी कुनापुढं,
हात न्हाई पसरला,
माय सांगाती संसार कराया,
माझा "बा" बी ईसरला,
त्या दारुनं त्येचा,
पार माकड केला,
आन सोन्यावानी संसाराचा,
बट्ट्याबोळ झाला....

पर माझी माय मातुर,
खमकी निघाली,
बेकार नवर्‍यामुळे,
ती बी हुशार झाली,
जवा बी आमच्यावर,
काय बी मुसीबत आली,
तेचा मुकाबला कराया,
"सिंधुताईं"वानी उभी राह्यली....

अशे किती तरी संसार,
उभारुन "सिंधुताई"सार्‍या,
जगाची "आई" झाली,
तिचाच आदर्श,
डोळ्यांम्होरं ठेऊन,
माझी माय,
माझ्या साठी,
"सिंधुताई" झाली....

नंदू


 (महाराष्ट्राची "आई" सिंधुताई सपकाळ यांना समर्पित)

No comments:

Post a Comment