Monday, October 3, 2011

रोमांचित मन माझं....

रोमांचित मन माझं,
तुला शोधु लागतं,
जसं फुलपाखरु फुलातला,
मध शोधु लागतं,
हिरव्या गार रानातलं,
ते पाखरु ही हर्षलेलं,
मग ओल्या मातीतला,
गंध शोधु लागतं....

रोमांचित मन माझं,
तुझ्याकडे वळु लागतं,
पानगळीतलं प्रत्येक पान,
आनंदाश्रु गाळु लागतं,
आठवणींतलं मन माझं,
बेधुंद होऊन,
माझ्याच स्वप्नांना,
छळ छळ छळु लागतं....

रोमांचित मन माझं,
तुला पाहु लागतं,
काळ्या मेघाचं ह्रदयही,
पाऊस होऊन वाहु लागतं,
धरित्रीच्या कुशीतलं,
पान अन पान मग,
निसर्गाच्या प्रेमवर्षावात,
आकंठ न्हाऊ लागतं....

रोमांचित मन माझं,
ह्रदयी तुझ्या भिडु लागतं,
माझ्या सावलीचं ह्रदयही,
तेव्हा धडधडु लागतं,
तुझी याद घेऊन येणारा,
वाराही उल्हसित झालेला,
सागराचं मन ही तेव्हाच,
सरीतेवर जडु लागतं....

रोमांचित मनाचा संयम,
जेव्हा सुटु लागतो,
चंद्र ही चांदणीची,
रेशीम मिठी मागतो,
बेधुंद झालेल्या मनाला,
कसे आवरावे आता,
कुशीत घेऊन आठवणींना,
मग मी स्वप्नांतच जागतो....
नंदू

No comments:

Post a Comment