Wednesday, October 5, 2011

मला आवडतं...

मला आवडतं...
पावसाचा थेंब व्हायला,
पृथ्वीच्या उदरातला,
कोंब बनुन रहायला....

मला आवडतं...
काळा मेघ व्हायला,
न पुसणारी पाषाणावरली,
रेघ बनुन रहायला....

मला आवडतं...
कोसळणार्‍या जलधारा व्हायला,
गात्र सुखावणारा अवखळ,
वारा बनुन रहायला....

मला आवडतं...
तिन्ही सांजेचं,
मंगल स्तोत्र व्हायला,
पुजेच्या ताम्हनातलं,
फुलपात्र बनुन रहायला....

मला आवडतं...
चांदणी रात्र व्हायला,
तारांगणातल्या चंद्राचे,
चित्र बनुन रहायला....

मला आवडतं...
पहाटेचं स्वप्नं व्हायला,
स्वप्नात न उलगडणारे,
प्रश्न बनुन रहायला....

मला आवडतं...
डोळ्यातलं काजळ व्हायला,
वाळवंटातलं फसवं,
मृगजळ बनुन रहायला....

मला आवडतं...
पानावरचं दवबिंदु व्हायला,
सागराच्या कुशीत शिरणारी,
सरीता सिंधु बनुन रहायला....

मला आवडतं...
मळलेली पाऊलवाट व्हायला,
त्याच वाटेवरनं चालताना,
थंड बोचरी पहाट बनुन रहायला....

मला आवडतं...
आयुष्याचा हस्तक व्हायला,
प्रारब्ध बनुन दारावर,
दस्तक द्यायला....

मला आवडतं...
उन पावसाचा खेळ खेळायला,
पाझरणार्‍या नयनांतुन,
आसवं होऊन गळायला....

मला आवडतं...
ओघवता मधाळ शब्द व्हायला,
कवितेतल्या भावना होऊन,
निशब्द बनुन रहायला....

खरंच मला आवडतं हो....
असंच काही बाही व्हायला,
तुम्हा मित्रांच्या ह्रदयात,
कविता बनुन रहायला....


नंदू

No comments:

Post a Comment