Wednesday, October 5, 2011

मला आवडतं...

मला आवडतं...
पावसाचा थेंब व्हायला,
पृथ्वीच्या उदरातला,
कोंब बनुन रहायला....

मला आवडतं...
काळा मेघ व्हायला,
न पुसणारी पाषाणावरली,
रेघ बनुन रहायला....

मला आवडतं...
कोसळणार्‍या जलधारा व्हायला,
गात्र सुखावणारा अवखळ,
वारा बनुन रहायला....

मला आवडतं...
तिन्ही सांजेचं,
मंगल स्तोत्र व्हायला,
पुजेच्या ताम्हनातलं,
फुलपात्र बनुन रहायला....

मला आवडतं...
चांदणी रात्र व्हायला,
तारांगणातल्या चंद्राचे,
चित्र बनुन रहायला....

मला आवडतं...
पहाटेचं स्वप्नं व्हायला,
स्वप्नात न उलगडणारे,
प्रश्न बनुन रहायला....

मला आवडतं...
डोळ्यातलं काजळ व्हायला,
वाळवंटातलं फसवं,
मृगजळ बनुन रहायला....

मला आवडतं...
पानावरचं दवबिंदु व्हायला,
सागराच्या कुशीत शिरणारी,
सरीता सिंधु बनुन रहायला....

मला आवडतं...
मळलेली पाऊलवाट व्हायला,
त्याच वाटेवरनं चालताना,
थंड बोचरी पहाट बनुन रहायला....

मला आवडतं...
आयुष्याचा हस्तक व्हायला,
प्रारब्ध बनुन दारावर,
दस्तक द्यायला....

मला आवडतं...
उन पावसाचा खेळ खेळायला,
पाझरणार्‍या नयनांतुन,
आसवं होऊन गळायला....

मला आवडतं...
ओघवता मधाळ शब्द व्हायला,
कवितेतल्या भावना होऊन,
निशब्द बनुन रहायला....

खरंच मला आवडतं हो....
असंच काही बाही व्हायला,
तुम्हा मित्रांच्या ह्रदयात,
कविता बनुन रहायला....










नंदू

Monday, October 3, 2011

त्या निरव शांततेत...

त्या निरव शांततेत ही,
त्या दोघांची पावलेच,
बोलत होती,
वाळुत शांत चालताना,
एकमेकांच्या मनीचं गुज,
खोलत होती....

त्याचा मर्दानी,
रांगडेपणा पाहुन,
तिची नाजुक काया,
लाजत होती,
तो ही शहारत,
होता तेव्हा,
जेव्हा तिची पैंजणे,
रुणूझुणू वाजत होती....

त्या निर्जन ठिकाणी,
तिचे बोलके डोळेच,
बरंच काही सांगत होते,
ओढाळलेले मन त्याचे,
तिच्या डोळ्यांच्या मधुशालेत,
बेधुंद झिंगत होते....

त्याला ही तिचा,
हा उन्मुक्त स्पर्श,
हवाहवासा वाटत होता,
पण अवखळ वाराच,
तिच्या गालांशी,
लडिवाळपणे झटत होता....

तिला ही त्याचं वदन,
आपल्या ओंजळीत.
धरायचं होतं,
अन त्याच्यापाशी,
सरकणार्‍या चांदणीला,
मागे सारायचं होतं....

स्पर्श ज्ञानाचं महत्व,
त्यांना तेव्हा कळत होतं,
जेव्हा त्यांच्या श्वासांमधुन,
प्राजक्त दरवळत होतं....








 नंदू

रोमांचित मन माझं....

रोमांचित मन माझं,
तुला शोधु लागतं,
जसं फुलपाखरु फुलातला,
मध शोधु लागतं,
हिरव्या गार रानातलं,
ते पाखरु ही हर्षलेलं,
मग ओल्या मातीतला,
गंध शोधु लागतं....

रोमांचित मन माझं,
तुझ्याकडे वळु लागतं,
पानगळीतलं प्रत्येक पान,
आनंदाश्रु गाळु लागतं,
आठवणींतलं मन माझं,
बेधुंद होऊन,
माझ्याच स्वप्नांना,
छळ छळ छळु लागतं....

रोमांचित मन माझं,
तुला पाहु लागतं,
काळ्या मेघाचं ह्रदयही,
पाऊस होऊन वाहु लागतं,
धरित्रीच्या कुशीतलं,
पान अन पान मग,
निसर्गाच्या प्रेमवर्षावात,
आकंठ न्हाऊ लागतं....

रोमांचित मन माझं,
ह्रदयी तुझ्या भिडु लागतं,
माझ्या सावलीचं ह्रदयही,
तेव्हा धडधडु लागतं,
तुझी याद घेऊन येणारा,
वाराही उल्हसित झालेला,
सागराचं मन ही तेव्हाच,
सरीतेवर जडु लागतं....

रोमांचित मनाचा संयम,
जेव्हा सुटु लागतो,
चंद्र ही चांदणीची,
रेशीम मिठी मागतो,
बेधुंद झालेल्या मनाला,
कसे आवरावे आता,
कुशीत घेऊन आठवणींना,
मग मी स्वप्नांतच जागतो....












नंदू

ते चार क्षण....

माझ्या वाट्याला,
आलेले ते चार क्षण,
तुझ्या ओंजळीत,
भरभरुन वहायचे होते,
त्या क्षणांना घट्ट,
बिलगुन मला,
तुझ्या आठवांच्या,
वर्षावात नहायचे होते....

तुझ्या स्मृतिंचे,
घोंघावणारे वादळ,
छातीवर झेलत,
मला सहायचे होते,
त्या गत क्षणांना,
छातीशी कवटाळुन,
तुझ्या स्वप्नांच्या,
जगातच रहायचे होते....

उरीची भळभळणारी,
जखम घेऊनच मला,
आता आयुष्य भर,
कण्हायचे होते,
जन्मभर तुझी आठवण,
ह्र्दयाशी जपत,
तुझ्या कुशीतच मला,
अखेरचे "राम" म्हणायचे होते....









नंदू

खुप वाटतं तु यावंस...

खुप वाटतं तु यावंस,
खुप वाटतं तु यावंस....

मला चोरुन भेटावंस,
माझ्याशी बोलावंस,
माझ्या सवे बसावंस,
मजकडे पाहुन हसावंस....

माझ्या केसांशी खेळावंस,
माझ्या आयुष्यात रुळावंस,
मला खुप खुप छळावंस,
माझ्या प्रेमावर जळावंस....

माझ्या वर रुसावंस,
माझ्या लोचनी दिसावंस,
माझ्या स्वप्नांत,
बिनघोर पणे वावरावंस,
मी पाहता तु,
अंग चोरुन बावरावंस....

माझ्या अंगणी,
अल्लडपणे बागडावंस,
तुझी थट्टा करता,
माझ्यावर बिघडावंस....

पण हे सारं आताशा,
काही केल्या होत नाही,
मनावरची गतस्मृतिंची धुंदी,
काही केल्या उतरत नाही....

तुझ्या ऐवजी,
येते ती तुझी सय,
अन मग बिघडुनच जाते,
उभ्या आयुष्याची लय....

मग येणार्‍या आठवणी,
होऊन जातात ताज्या,
जणु ह्रदयी असंख्य,
सुया टोचतात माझ्या....

आता ती तुझी,
आठवण ही नको,
अन तुझं येणं ही,
अवघड होऊन बसतं,
विस्कटलेल्या मनाने हे,
एकटे पणाचं जीणं ही....









नंदू

कल्पनेच्या पलीकडचा गाव....

कल्पनेच्या पलीकडे ही,
एक गाव असतो,
त्यात ती राणी अन,
तो राव असतो,
त्या दोघांच्या भेटीचा,
एक सुंदर पाडाव असतो,
कल्पनेच्या पलीकडे ही,
एक गाव असतो....

कल्पनेच्या पलीकडे ही,
एक गाव असतो,
त्या दोघांच्या ही मनांचा,
एकमेकाला लगाव असतो,
जसा अवखळ सरीतेचा,
अथांग सागराकडे बहाव असतो,
कल्पनेच्या पलीकडे ही,
एक गाव असतो....

कल्पनेच्या पलीकडे ही,
एक गाव असतो,
डोंगर दर्‍यांना ही,
निसर्गाचा ठांव असतो,
निसर्गाने धरेच्या भेटीसाठी,
केलेला हा सारा बनाव असतो,
कल्पनेच्या पलीकडे ही,
एक गाव असतो....

कल्पनेच्या पलीकडे ही,
एक गाव असतो,
त्याला भेटताना तिच्या,
मनात अरेराव असतो,
तिला भेटण्यासाठी त्याच्या,
भावनांत बडेजाव असतो,
कल्पनेच्या पलीकडे ही,
एक गाव असतो....

कल्पनेच्या पलीकडे ही,
एक गाव असतो,
तिच्या स्वप्नीचा तो,
चंद्र राव असतो,
अन तिला ही तेव्हा,
चांदणीचा भाव असतो,
कल्पनेच्या पलीकडे ही,
एक गाव असतो....

कल्पनेच्या पलीकडे ही,
एक गाव असतो,
दोघांच्या ही कल्पनेतला,
प्रेमाचा गाव एकच असला,
तरी ही दोघांच्या ही मनांमध्ये,
कधी ही दुजाभाव नसतो.....

कल्पनेच्या पलीकडे ही,
एक गाव असतो,
तो तुमच्या आमच्या मनांचा,
अलगद घेत ठांव असतो....











नंदू

Saturday, August 27, 2011

कधी तु....

कधी तु.....
वीज बनुन कोसळतेस,
कधी तु.....
पावसाच्या थेंबांतुन गळतेस,
कधी तु.....
अश्रु बनुन ओघळतेस,
कधी तु.....
आठवणींत येऊन छळतेस,

कधी तु.....
भासतेस पौर्णिमेच्या चांदण्यांत,
कधी तु.....
असतेस अंगठीच्या कोंदणात,
कधी तु.....
दिसतेस तुळशी वृंदावनात,
कधी तु.....
हसतेस मंद हवेसारखी कुंद वनात,

कधी तु.....
प्राजक्त बनुन अंगणात,
कधी तु.....
प्रारब्ध म्हणून प्राक्तनात,
कधी तु.....
गहिवरलेल्या भावनांत,
कधी तु.....
निरागस बछड्यांच्या रिंगणात,

तु.. तु.. तु आणि तु,
तुझा तीळ,तुझी शीळ,
तुझी खळी,जशी चाफेकळी,
तुझे भुरभुरणारे केस,लावती वार्‍याशी रेस,
सारे सारे कसे आपले वाटु लागलेत....

कधी पुस्तकाच्या पानात,
कधी घनदाट रानात,
कधी आवखळ वार्‍यात,
कधी खळाळणार्‍या झर्‍यांत,
अन आताशा तर स्वप्नांत सुद्धा,
मला वरचेवर भेटु लागलेत....

कधी तरी तु मला भेटशील,
कधी तरी पराग कणांत असशील,
कधी माझ्या प्रित चौकटीत बसशील,
का,नेहमी सारखीच स्वतःवर रुसशील...?
तुझ्या कडे असेल ही ह्याचे उत्तर,
पण मी मात्र निशब्द अन निरुत्तर....












नंदू