Friday, March 25, 2011

हे कळतंच नाही नंतर...

प्रेमाच्या एकाच वाटेवर,
चालत होतो आपण,
ठेऊनी जरासे अंतर,
विरघळल्या साई सारखे,
कधी,कसे एकरुप झालो,
हे कळलेच नाही नंतर....

तु ही तीच अन,
मी ही तोच होतो,
पण असे वाटले तेव्हा,
जगण्याचा मार्ग दिसला,
विरहात होरपळल्या नंतर.....

अंतरंगीचे रंग हे जणु,
भासत होते कोरडेच तेव्हा,
पण खरा रंग मनी भरला,
तु ह्रदयी विसावल्या नंतर....

अंधार अंतरी दाटला होता,
प्राणही शुष्क भासत होता,
अंधारलेल्या वाटेवर मला,
हा लोभसवाणा चेहरा दिसला,
अंतरीचा दिवा उजळल्या नंतर.....

ती वाट ही जराशी,
आता संकोचली होती,
तुला काही विचारण्या,
खुप आतुरली होती,
पण भानच ना उरले तेव्हा,
तुझे स्मित झळकल्या नंतर....

आता ती वाट,
फार मळली आहे,
जीवनाच्या रगाड्यात,
रुळली आहे,
आता मात्र ठेवावे,
लागतच नाही अंतर,
तरी सुद्धा कधी,
कसे एकरुप होतो,
हे कळतंच नाही नंतर.......
हे कळतंच नाही नंतर.......












नंदू

माझी मीच....

माहीत आहे मला चांगलं,
तुझं हे वागणं नेहमीचंच आहे,
पण अंतरंगी अगदी अस्वस्थ,
मात्र, माझी मीच आहे......

तुला त्याची पर्वाच नाही,
तुझं हे सतावणं रोजचंच आहे,
पण ह्र्दयी अगदी खिन्न,
मात्र, माझी मीच आहे.....

कधीतरी मला समजुन घेशील,
याच आशेत वावरायचं आहे,
पण निराशेने विछिन्न,
मात्र, माझी मीच आहे.......

चंद्र,चांदण्या,रातराणीचा सुगंध,
हे फक्त आता कल्पनेतच आहे,
पण हे सर्व स्मरताना उद्विग्नं,
मात्र, माझी मीच आहे........

आता फक्त तुझ्याच आठवणींना,
उराशी घेउन कवटाळायचं आहे,
त्या सरत्या आठवणींची साक्षी,
मात्र, माझी मीच आहे.......












नंदू

असे काय घडले....?

माझ्याही नकळत आज,
असे काय घडले,
नाही म्हणताना मन,
हे तुझ्यावरच का जडले.....?

दिली होती ताकीद,
एवढ्याच साठी डोळ्यांना,
तरी वेंधळे नयन माझे,
तुझ्या साठीच का रडले.....?

ठरवले होते असे,
मनाशी माझ्याच कैकदा,
तरी अधीर मन माझे,
तुझ्याच पाशात का जखडले....?

बजावले होते पावलांना,
अडखळु नका कधीही,
तरी अस्थिर पाऊल माझे,
तुझ्याच दारी का धडपडले.....?

फिरुन कधीही पुन्हा,
गहीवरायचे नव्हते मला,
तरीही अनावर असे दोन अश्रु,
तुझ्याच ओंजळीत का सांडले....?

वेदना ह्रदयीची दाखवुच,
द्यायची नव्हती मला,
तरी उरीच्या वेदनेचे शल्य,
तुझ्याच कानी का ओरडले....?

अथक प्रयत्ना नंतर ही,
तुला नकार देववेना,
"नाही"हे शब्द ही माझ्या,
ओठांवरच का अडले......?












नंदू

शाळा

आज फिरुन, पुन्हा एकदा,
शाळेत जावसं वाटतंय,
शाळेतल्या त्या बाकावर,
लहान होऊन बसावसं वाटतंय....

त्या अनोळखी,
चेहर्‍यांचं ओळखीत,
अन पुढे घट्ट मैत्रीत,
झालेलं रुपांतर,
त्या वर्गातल्या,
बैसण्याच्या जागेतलं,
आपसुक कमी,
झालेलं ते अंतर,
लहानपणीची ती गंमत पुन्हा,
अनुभवावी असं वाटतंय,
फिरुन एकदा नव्याने,
बालपण जपावसं वाटतंय......

माध्यमिक शाळेत गेल्यावर,
आलेलं ते जरासं शहाणपण,
त्याच उन्मादात विरुन,
गेलेलं ते लहानपण,
बालपणाचे ते वारु,
चौखुर उधळावं असं वाटतंय,
फिरुन एकदा नव्याने,
मास्तरांच्या छडीशी सलगी,
करावी असं वाटतंय......

गणिताच्या पाढ्यांनी,
उडणारी ती तारांबळ,
ईंग्रजीच्या धड्यांनी नष्ट,
व्हायचं अंगचं बळ,
विज्ञानाची कारणं तर,
द्यावी लागायची बख्खळ,
पुन्हा एकदा,
आईच्या कुशीत शिरुन,
बाराखडी म्हणावसं वाटतंय,
बाबांच्या धाकात राहुन,
त्यांचा ओरडा खावासं वाटतंय.......

ईतिहास आणि भुगोलाचा,
दरारा केवढा मोठा,
हिंदी मराठीच्या मार्कांना,
मात्र नव्हता कधीच तोटा,
नागरीक शास्त्राच्या तासाप्रमाणं,
नागरीक व्हावसं वाटतंय,
पुन्हा एकदा प्रगती पुस्तकातला,
लाल शेरा टाळावसं वाटतंय......

मधल्या सुट्टीत,
आईने दिलेली,
सवंगड्यां सोबत,
खाल्लेली पुरणपोळी,
वर्गात फाऊंटन पेनने खेळलेली,
ती नीळ्या शाईची होळी,
आज मात्र,
बॉल पेन आल्याने,
मन जरा खट्टु होतंय,
पुन्हा एकदा नव्याने,
ती नीळी होळी खेळावसं वाटतंय....

दहावीच्या वर्गातला तो,
शेवटचा समारोप सोहळा,
नाही म्हटलं तरी सरांचाही,
डबडबला होता डोळा,
पुन्हा केव्हा भेटु म्हणुन,
गळाभेट करावसं वाटतंय,
आज पुन्हा एकदा ते,
सारं आठवावंस वाटतंय......

आज फिरुन पुन्हा एकदा,
शाळेत जावसं वाटतंय,
शाळेच्या त्या विशाल प्रांगणात,
लहान होऊन बागडावसं वाटतंय.......











नंदू

नियम

बगळ्याने धरले ध्यान,
माशास न उरले त्राण,
एकाचा होई खेळ,
दुसर्‍याचा जाई प्राण.....

जंगलचे कायदे ही तसेच,
अन त्याचे ही कैक प्रकार,
हरीणाचा जीव येई कंठाशी,
वाघाला मिळते शिकार.....

आकाशीच्या पक्षांची दशाही,
वेगळी अशी नाही काही,
आसुसल्या गिधाडांच्या तोंडी,
चिमण्या पाखरांचा जीव जाई.....

भावनाशुन्य मानवाच्या जगात,
याहुन दुसरे काय घडणार,
धन दांडग्यांच्या होमात,
उपेक्षितांची आहुती पडणार.....

मानव असो वा पशुपक्षी,
सर्वांना लागु नियम एक,
मिळुन रहा रे सार्‍यांनी,
होऊ नये गर्वाचा अतिरेक.....










नंदू

Wednesday, March 16, 2011

मौन










तु किती ही मौन पाळलंस तरी,
तुझ्या डोळ्यांची भाषा कळत होती,
ह्रदयाची स्पंदनं अबोल झाली तरी,
माझ्या ह्रदयात ती घोळत होती.....



तु किती ही मौन पाळलंस तरी,
तुझी नजर खाली वळत होती,
मी नजर द्यायचं म्हटलं तरी,
माझ्या नजरेला नजर द्यायचं टाळत होती.....

तु किती ही मौन पाळलंस तरी,
मला ह्रदयाची भाषा कळत होती,
तुझ्या ह्रदयाची धडधड वाढली तरी,
माझ्या ह्रदयात ती मिसळत होती.....

तु किती ही मौन पाळलंस तरी,
तुझ्या ओठांची भाषा कळत होती,
तु कितीही नाकारायचं म्हटलंस तरी,
दाताखाली ओठ दाबुन कळवळत होती.....

तु किती ही मौन पाळलंस तरी,
तुझी देहबोली स्पष्ट होत होती,
ओठांवर नाही असलं तरी ही,
मान हो म्हणण्यास तळमळत होती.....

प्रेमाच्या नाजुक गणिताला,
मौनाची वजाबाकी छळत होती,
भागायचं नसलं काही ही, तरी,
नजरेची बेरीज गुणल्यानं जुळत होती.....

नंदू

Tuesday, March 15, 2011

सहजच.....

नात्याची वीण,
खुप घट्ट असावी,
त्यात कुठल्याही,
गैरसमजाची,
गाठ सैल नसावी....