Saturday, February 26, 2011

"मला मात्र नेहमी"

आयुष्याच्या काही वळणांवरती,
काही मोक्याची,काही धोख्याची,
वळणे आली....
पण मला मात्र नेहमी,
आडवळणाची वाट भावली......

काही मळलेल्या वाटे वरुन,
काही अनोळखी पावले धावली,
पण मला मात्र नेहमी,
ओळखीचीच पावले भावली......

काही अनोळखी वाटे वरुन,
दिसली काही अननुभवी,
पावलांची अशांत सावली,
पण मला मात्र नेहमी,
अनुभवी सावलीच भावली.....

काही अनवट वाटे वरुन,
खळाळती सरीता धावली,
पण मला मात्र नेहमी,
सागराची शांत गाज भावली.....

काही अंधार्‍या वाटे वरुन,
काजव्यांची लुकलुकती,
पावले हेलकावली,
पण मला मात्र नेहमी,
चमचमत्या तार्‍य़ांचीच,
सोबत भावली....

काही घनदाट पायवाटे वरुन,
काही खुरटी झुडुपे धावली,
पण मला मात्र नेहमी,
भावली डेरेदार वृक्षाचीच सावली......

आयुष्य असंच अनेक,
वळणा वळणांनी धावणारं,
काट्याकुट्यांच्या वाटेवरुन पळणारं,
कुणास ठाऊक,
किती वर्ष त्यावरुन सरली,
म्हणुनच मी मात्र नेहमी,
आडवळणाचीच वाट धरली.......

नंदू

Friday, February 25, 2011

सहजच.....

काळोखातुन प्रकाश अंश,
क्षितिजापार धावत असतो,
त्याच प्रकाशातुन मंद वारा,
वेड्यासारखा वहावत असतो...

सहजच.....

तु फितुर,तुझे शब्द फितुर,
मी आतुर,माझी प्रित आतुर,
मनीची तार झणकारताना,
मंद स्वरांनी सजते संतुर.......

सहजच.....

तुझ्या फितुर झालेल्या शब्दांना,
माझ्या कडे वळवावेसे वाटते,
पण मन तुझ्यापाशीच घुटमळतेय,
हे मनानेच कळवावेसे वाटते.......

सहजच.....

निरोपाचा हात हलवताना,
मनी हुंदका का दाटला,
"परत भेटु" असं म्हणताना,
स्वर माझा का आटला.......

सहजच.....

त्या वास्तुतले ते झुंबर,
आता जरी असले ओशाळवाणे,
पण कधीतरी ते ही होते,
दिमाखदार अन देखणे.......

"कलश रीता"

तो शांत महासागर,
ती अवखळ सरीता,
तो महायोगी वटवृक्ष,
ती लाजरी बुजरी लता.....

तो कृष्ण सखा गोपालांचा,
ती राधे सम कांता,
तो आदर्श श्री रामाचा,
ती कारुण्यमयी सिता.....

तो सावली हिमालयाची,
ती हिमशिखरांची गाथा,
तो पाया भक्कम मंदिराचा,
ती उंच कळस माथा.....

तो अभंग तुकयाचे,
ती ज्ञानोबाची गीता,
तो अविचल महामेरु,
ती अल्लड चंचल स्मिता.....

त्या दोहोंच्या प्रितिची ही,
अनोखी प्रेम कथा,
ती प्रेमातुर गौरांगीणी,
तो प्रेम अर्पिणारा कलश रीता..........










नंदू