Wednesday, April 27, 2011

ऐन वसंतातल्या त्या रात्री....

ऐन वसंतातल्या त्या बेधुंद रात्री,
पावसाची एक जोरदार सर आली,
ऋतुराजाच्या त्या अवचित आगमनाने,
रातराणी ही बेभान झाली.....

अवखळ वारा ही होता संगतीला,
प्राजक्ताचा गंध ही होता पंगतीला,
आसमंत ही कसा बहरून आला,
सुटला दरवळ ओल्या मातीला.....

आकाशीचा चंद्रमा ही,
हसत होता गाली,
चांदणीच्या ही मुखकमलावर,
फुटली होती लाली,
निसर्गाचा हा अनोखा खेळ पहात,
झाडावरची पाखरं ही चिडीचुप झाली.....

तशातच ती,
त्याच्या हाताला धरुन,
आडोसा शोधीत होती,
पावसाच्या अवचित कोसळण्याने,
दोघंही चिंब भिजत होती,
त्याची चोरटी नजर,
तिच्या चेहर्‍यावर खिळली,
तिच्या केसांतली एक ओली बट,
तिच्या नाजुक गालाशी झोंबत होती.....

मग तोही जरासा बावरला,
तिने ही ढळणारा पदर सावरला,
ती दोघंही मग,
प्रितीची वाट चालू लागली,
कोकिळही बेभानपणे,
मस्त शीळ घालू लागली.....

ऐन वसंतातली ती रात्र,
कशी बेधुंद झाली होती,
त्या प्रेमिकांच्या मनातली,
दरी ही अरुंद झाली होती,
अवखळ वारा आता कसा,
बेधुंद,बेलगाम झाला होता,
अन ओली माती सुगंधाने,
कशी स्वच्छंद न्हाली होती.......

नंदू

No comments:

Post a Comment