Wednesday, April 27, 2011

!!! इथे काही घडतच नाही !!!

इथे काही घडतच नाही....
ओल्या गवतावर दंव पडतच नाही,
पहाटेचा सुर्य ही इथे उदासच भासे,
इथला पक्षीही काही केल्या उडतच नाही....

इथे काही घडतच नाही....
इथल्या गायी वासरांना चारा उरतच नाही,
उपासलेल्या पोटांनी फिरती बिचारी,
कारण इथल्या नेत्यांची पोटं भरतच नाही....

इथे काही घडतच नाही....
मंदिरात रांग लागतच नाही,
व्हिआयपी पासाला मागणी इथे फार,
कारण पुजार्‍याचे दक्षिणेशिवाय भागतच नाही....

इथे काही घडतच नाही....
निसर्गाची हानी वाचतच नाही,
सिमेंटच्या जंगलात मनुष्याचेच प्राण वेठीस,
कारण इथल्या राज्यकर्त्यांना,
चांगले काही सुचतच नाही....

इथे काही घडतच नाही....
कुणी कुणाच्या भानगडीत पडतच नाही,
मला काय करायचे त्याचे म्हणून,
मेलेली मनं कधी रडतच नाही....

इथे काही घडतच नाही....
लहानग्याच्या तोंडात दुधाचा थेंब पडतच नाही,
पावडरच्या दुधावरच भागव म्हणते माय त्याची,
माऊलीला पान्हा कधी फुटतच नाही....

इथे काही घडतच नाही....
खाचखळग्याची वाट संपतच नाही,
अंतिम ध्येयासाठी ही अडथळे फार,
लाचेचं दान टाकल्याशिवाय,
इथल्या फाईलीचं पाऊल पुढे पडतच नाही....

इथे काही घडतच नाही....
सुदैवाचे दान काही पडतच नाही,
सांगण्या सारखे इथे फार काही आहे,
पण शुष्क झालेल्या ओठांवर,
ओला शब्द काही केल्या येतच नाही....

नंदू

No comments:

Post a Comment